२५ हजारांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता

महाशिवरात्रीला एलिफंटा (घारापुरी) बेटावरील कोरीव शिवलेण्यांचे दर्शन घेण्यासाठी उरणच्या मोरा बंदरावरून प्रवास करणाऱ्या हजारो शिवभक्तांसाठी महाराष्ट्र मेरिटाई बोर्डाकडून जलप्रवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. याची आढावा बैठक उरण तहसील कार्यालयात घेण्यात आली. यावेळी महाशिवरात्रीनिमित्ताने येणारे शिवभक्त व त्यांची सुरक्षा तसेच प्रवासाविषयी चर्चा करण्यात आली. घारापुरीला जाण्यासाठी अधिकृत जलसेवा देण्यात येणार असल्याची माहिती मोरा बंदरातील बंदर अधिकाऱ्यांनी दिली. यावर्षी महाशिवरात्रीला येणाऱ्या शिवभक्तांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शुक्रवारी महाशिवरात्र आहे. दर महाशिवरात्रीला रायगड, नवी मुंबई तसेच ठाणे जिल्ह्य़ातून येणारे हजारो भक्त नवी मुंबईतील बेलापूर, न्हावा बंदर तसेच उरणच्या मोरा बंदरातून प्रवास करतात. हा प्रवास अधिकृत व सुखरूप व्हावा याकरिता महसूल, शासकीय, पोलीस, बंदर तसेच आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. उरणच्या तहसीलदारांनी या सर्व विभागांतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. घारापुरीला प्रवाशांना ने-आण करण्यासाठी जलप्रवासाची परवानगी असलेल्या लाँचसाठी निविदाही काढल्याची माहिती मोरा बंदर अधिकारी अरविंद सोनावणे यांनी दिली. मात्र या निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही. महाशिवरात्रीला असलेल्या ओहटीमुळे लाँच मालक येण्यास तयार नाहीत. त्यामुळे मोरा परिसरातील ज्या मच्छीमार बोटींना जलप्रवासाची परवानगी आहे, त्यांना वाहतुकीची परवानगी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परतीच्या प्रवासासाठी १०० रुपये

मोरा बंदर ते घारापुरी प्रवासासाठी ४५ रुपये आणि ५ रुपये कर असे ५० रुपये आकारण्यात येणार आहेत. त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी प्रत्येकी १०० रुपये मोजावे लागणार आहेत.