पावसाने काढता पाय घेतल्याने मोरा ते मुंबई (भाऊचा धक्का) या जलवाहतूक सेवेचे दर एक ऑक्टोबरपासून कमी होणार आहेत. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून वाहतूक बोटींमधील आसन संख्या कमी करून ही दरवाढ केली जाते. एक ऑक्टोबरपासून साध्या बोटींचे दर ५० रुपयांवरून ४५ रुपये, तर नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्पीड बोटीचे दर ७५ वरून ५२ रुपये होणार आहेत. पावसाळ्यात समुद्राचे रौद्र रूप लक्षात घेऊन मुंबई ते अलिबाग दरम्यानच्या रेवस ते मुंबई तसेच मांडवा ते मुंबई या जलसेवा बंद असतात. मात्र उरण ते मुंबई दरम्यानची सेवा अतिधोकादायक स्थितीतच स्थगित केली जाते. त्यामुळे अलिबाग ते मुंबई दरम्यानचे जलप्रवासीही पावसाळ्यात या मार्गाने प्रवास करतात. अलिबाग ते मुंबई तसेच उरण ते मुंबई दरम्यानच्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. तसेच जलमार्ग हा प्रदूषणरहित तसेच कमी खर्चाचा असल्याने प्रवासी या मार्गाला प्राधान्य देतात. मोरा ते मुंबई दरम्यान आर. एन. शििपग कंपनीकडून ५२ रुपयांत अध्र्या तासात मुंबई गाठणारी स्पीड बोट सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्येत वाढ झालेली आहे.