रविवारी मध्यरात्रीपासून ९६८७ क्युसेक्स विसर्ग

नवी मुंबई नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण शनिवारी मध्यरात्री २ वाजता भरले. सलग तीन वर्ष धरण भरले असून जुलै २०२०पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणात झाला आहे. यावर्षी पहिल्यांदा पावसाने ओढ दिल्याने धरण भरेल की नाही याची चिंता लागली होती. मात्र गेल्या आठवडय़ात झालेल्या मोठय़ा पावसामुळे धरण भरून वाहू लागले आहे.

यावर्षी पावसाला सुरुवात झाली तेव्हा धरणात फक्त ४० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे तत्कालीन आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी १० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला होता. जून महिन्यात तर अल्प पाऊस झाल्याने यंदा धरण भरणार का? याबाबत प्रशासनाला चिंता लागली होती. परंतु जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. ऑगस्टच्या पहिल्या चार दिवसांतही झालेल्या मोठय़ा पावसामुळे रविवारी मध्यरात्री धरण पूर्ण भरले आहे. धरण परिसरात अद्यापही संततधार सुरू असल्याने रविवारी मध्यरात्रीपासून ९६८७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. लवकरच महापौर व मान्यवरांच्या हस्ते मोरबे धरण येथे जलपूजन केले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

मोरबे धरणात जलसाठा कमी राहिल्याने १० टक्के पाणीकपात सुरू केली होती. परंतु धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण भरले आहे. जुलै २०२० पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणात झाला असून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

-मनोहर सोनावणे, कार्यकारी अभियंता, मोरबे प्रकल्प.

* धरणाची क्षमता : ८८.२० मीटर

* जलसाठा : १९०.८९ दशलक्ष घनमीटर

* शहरात पडलेला पाऊस : १०७४ मिमी.

* मोरबे पाणलोट क्षेत्रातील पाऊस : ८३९.४० मिमी.