धरण पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस

नवी मुंबई गेल्या वर्षी २४ जुलै रोजी मोरबे धरण भरले होते. यावर्षी मात्र कमी पाऊस असल्याने धरण भरते की नाही याबाबत साशंकता होती. मात्र २७ जुलै रोजी एका दिवसात धरण पाणलोट क्षेत्रात ३३० मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे धरणाची पातळी झपटय़ाने वाढत धरण ८० टक्के भरले आहे. धरण भरण्यासाठी अजून १००० मिलिमीटर पावसाची आवश्यकता आहे.

पावसाने ओढ दिल्याने धरणपातळी वाढ होण्याऐवजी १९ जुलैपासून कमी होऊ  लागली होती. त्यामुळे पाणीकपातीत वाढ होण्याचे संकट नवी मुंबईकरांवर निर्माण झाले होते. मात्र शुक्रवारी २७ जुलै रोजी सकाळी ८.३० ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत या परिसरात पावसाचा विक्रम झाला. १४ वर्षांत एका दिवसात ३३० मिलिमीटर पाऊस पहिल्यांदा झाला. २६ जुलै २००५ रोजी धरण पाणलोट क्षेत्रात विक्रमी ६१५ मिलिमीटर पाऊस झाला होता. पावसाचा जोर असाच राहिल्यास काही दिवसांतच धरण भरेल, असा विश्वास मोरबे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता  मनोहर सोनावणे यांनी सांगितले.

धरण ८८ मीटरला भरते

* २९ जुलै धरण पाणीपातळी : ८४.०५ मीटर

* शहरात पडलेला पाऊस : २२६० मिलिमीटर

* मोरबेत पाणलोट क्षेत्रातील पाऊस  : २३७५ मिलिमीटर