पावणेदोनशे पाळणाघरांची झाडाझडती

खारघर येथील पाळणाघरात अवघ्या दहा महिन्यांच्या बालिकेला मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे. नवी मुंबई पनवेल परिसरात किती पाळणाघरे आहेत हे जाणून घेण्यात यावे आणि त्यांना कायद्याच्या कक्षेत आणावे, असा आदेश नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिला आहे. त्यामुळे पनवेल परिसरातील सुमारे पावणेदोनशे पाळणाघरांची झाडाझडती तीन दिवसांपासून सुरू आहे. सध्या सुमारे १७० पाळणाघरे, प्ले ग्रुप आणि नर्सरी सुरू असल्याचे आढळले आहे.

मारहाण झालेल्या बालिकेवर सध्या  वाशीतील फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाळणाघरांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पावले उचलली आहेत. नवी मुंबईमधील पाळणाघरे, प्ले ग्रुप व नर्सरीमध्ये यापुढे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

त्यांचे ३० दिवसांचे चित्रीकरण ठेवणे गरजेचे आहे. तसेच या कॅमेरामधील चित्रीकरण थेट पालकांना पाहता यावे यासाठी या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा युजर आयडी संबंधित पालकांच्या संगणक प्रणालीशी जोडला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दर २४ तासांनी प्ले ग्रुप, पाळणाघरांच्या मालकांनी हे सीसीटीव्ही चित्रीकरण स्वत: पाहणे बंधणकारक करण्यात आले आहे. या चित्रीकरणात काहीही आक्षेपार्ह आढळल्यास स्थानिक पोलिसांशी तात्काळ संपर्क साधणे ही पाळणाघर मालकांची जबाबदारी ठरणार आहे.

यापुढे या व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. बाळाला पाळणाघरात सोडण्याची आणि तेथून घरी नेण्याची वेळ नोंदवहीत नोंदवण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

*  अफसानाला ४ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असली, तरीही पोलिसांना याप्रकरणी प्रियंका निकमचा ताबा मिळवायचा आहे. प्रियंकाला खुद्द न्यायालयाने जामिनावर सोडल्यामुळे तिचा जामीन नामंजूर करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. तिचा ताबा मिळावा यासाठी पोलिसांनी न्यायालयात विनंती अर्ज केला आहे.

सध्या या प्ले ग्रुपमालकांना सात ते आठ हजार रुपयांत ८ ते १० तास मदतनीस महिला कामाला मिळत नाहीत. खारघरमधील पूर्वा प्ले ग्रुपच्या मालक प्रियंका निकम हिनेसुद्धा अफसाना शेख हिला चार महिन्यांअगोदर पाच हजार रुपये पगार दिला होता. प्रियंका ही थेट अफसानाला ओळखत नव्हती. प्रियंकाच्या शेजारच्या घरात अफसाना घरकामगार होती. पहिले दोन महिने अफसानाला सात हजार रुपये पगार देण्यात आल्याचे तिने पोलिसांच्या जबाबात म्हटले आहे.

प्रियंकाच्या बहिणीची व वडिलांची रविवारी पोलिसांनी चौकशी केली. निकम दाम्पत्य हे कोल्हापूरचे असून समाजमाध्यमांवर या घटनेतील बाळाला मारहाण झाल्याचे चित्रीकरण पसरल्यानंतर हे दोघेही स्वत:च्या घरात नसल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.