नवी मुंबईतील प्रमुख सांस्कृतिक केंद्र असलेल्या वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहाच्या रंगमंचावर एकीकडे उत्तमोत्तम प्रयोग रंगत असताना प्रेक्षागृहातील बेसुमार डासांचे गुणगुणणे प्रेक्षकांचे ‘मनोरंजन’ करीत आहे. या अवकळेकडे व्यवस्थापनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून डासांच्या बरोबरीने आसनांच्या कापडाला येणारा वासही प्रेक्षकांना अस्वस्थ करीत आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान डासांच्या उपद्रवामुळे रसिकांचा रसभंग झाला. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सिडकोने १९९५ मध्ये सुमारे १६ कोटी रुपये खर्च करून या नाटय़गृहाची निर्मिती केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नाना पाटेकर यांनी या नाटय़गृहाचे भरभरून कौतुक केले होते. त्या नाटय़गृहाची आता रया जात असून डास, उंदीर, मळके पडदे, दरुगधी, मद्यपी कर्मचारी अशी एक नवीन ओळख तयार होऊ लागली आहे. उस्ताद झाकीर हुसेन व निलाद्री कुमार यांची तबला व सतारवादनाची जुगलबंदी रंगली असताना डासांच्या उपद्रवामुळे अनेक रसिक त्रस्त झाले. मध्यंतरी याच भावे नाटय़गृहात वाद्यवंृदाच्या एका कार्यक्रमात रंगमंचावर पावसाच्या पाण्याचा अभिषेक झाला होता. त्यानंतर दोन महिने हे नाटय़गृह डागडुजीसाठी बंद ठेवण्यात आले होते. यात तुटलेल्या काही खुच्र्या दुरुस्त करण्यात आल्या, मात्र काही प्रेक्षकांच्या डोक्यावरील तेलामुळे डागाळलेल्या खुच्र्याचे कापड मात्र अद्याप तसेच आहे. हे कमी म्हणून नाटय़गृहाचे काही कोपरे तळीरामांचे अड्डे झाले आहेत. त्यामुळे सकाळ संध्याकळ ‘टाकून’च हे कर्मचारी काम करीत असल्याची चर्चा आहे. नाटय़प्रयोग सुरू होईपर्यत प्रेक्षकांना तिकीट विक्री केंद्राजवळील मोकळ्या जागेत वाट पाहावे लागते. ही वेळ कधी कधी नियोजित वेळेपेक्षा वाढत असल्याचे दिसून येते. डास होतात म्हणून प्रशासनाने बंद केलेल्या कारंज्याजवळ आजही डासांचे साम्राज्य असल्याने नाटय़प्रयोगाअगोदर प्रेक्षकांना डास मारण्याचे प्रयोग पार पाडावे लागतात.

मनसेने मध्यंतरी या नाटय़गृहातील नादुरुस्त वातानुकूलीन यंत्रणेचा प्रश्न मांडल्यानंतर आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या नाटय़गृहाची पाहणी केली. त्यानंतरही नाटय़गृहाची स्थिती जैसे थे आहे.