‘होल्डिंग पॉण्ड’मध्ये घाणीचे साम्राज्य; कचऱ्याचे ढीग
ऐरोली सेक्टर १४ आणि १५ परिसरातील गणपती मंदिराजवळील ‘होल्िंडग पॉण्ड’भोवती घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा श्वास दरुगधीने गुदमरला आहे. त्यातच ऐरोली खाडीकिनारी डासांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. त्यामुळे ‘मॉर्निग वॉक’साठी येणाऱ्या नागरिकांवर डास हल्ला चढवत असल्याचे चित्र रोजच पाहायला मिळत आहे. या भागात मलेरियाचे रुग्ण आढळल्याने सकाळी शारीरिक तंदुरुस्ती कमावण्यासाठी जाणाऱ्यांवर रोगांची आफत ओढवली आहे.
मुंबईतून नवी मुंबईत प्रवेश केल्यांनतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनानजीकच्या परिसरातील प्रभाग क्रमांक १५ येथे अनेक वर्षांपासूनचा प्रस्तावित होल्डिंग पॉण्ड आहे. या होल्डिंग पॉण्डचा विकास न झाल्याने तो सध्या पडीक अवस्थेत आहे. या ठिकाणी गाळ साचल्याने डासांचे प्रमाण वाढले असून सर्वत्र दरुगधी पसरली आहे.
अनेकदा माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी महापालिकेला लेखी निवेदन देऊनही या ‘होल्डिंग पॉण्ड’ची स्वच्छता करण्यात आलेली नाही. या होल्डिंग पॉण्डवर मंदिर परिसर आणि गृहनिर्माण संस्थामधून कचरा टाकण्यात येत आहे. त्यातच कांदळवन वाढल्याने मातीचे गाळ तयार होऊन त्या ठिकाणीही घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
स्थानिक नगरसेविका संगीता पाटील यांनी महासभेमध्ये होल्डिंग पॉण्डचा गाळ काढून पर्यावरणपूरक असे सुशोभीकरण करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रभागातील मलेरिया आणि विविध आजारांचे रुग्ण पाहता नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पर्यटकांच्या आनंदावर विरजण
नवी मुंबईतील वाशी मिनी सोशर येथील होल्डिंग पॉण्डवर बोटिंगची सुविधा करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्यटकांच्या दृष्टिकोनातून त्याचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. हे पाहण्यासाठी अनेक नागरिक येतात. मात्र मागील १० वर्षांपासून मागणी करूनही ऐरेाली येथील होल्डिंग पॉण्डच्या वाशीच्या धर्तीवर विकास करण्यात न आल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 30, 2016 12:34 am