नवी मुंबई पालिका प्रशासनात काही अधिकारी दालनाविना

नवी मुंबई : चार हजार कोटी रुपयांचे वार्षिक अंदाजपत्रक आणि अडीच हजार कोटी रुपयांच्या ठेवी असल्याने राज्यात श्रीमंत पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई पालिकेत प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या लक्षवेधी ठरली आहे. करोना रुग्णसंख्या वाढत असताना पालिकेत दोन अतिरिक्त आयुक्त आणि दहा उपायुक्तांची ही पालिका आता वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविणार अशी अपेक्षा नवी मुंबईकर व्यक्त करीत आहेत.

नवी मुंबई पालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची १५ महिन्यांत उचलबांगडी करण्यात आली. रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यात आलेले अपयश हे त्यांच्या बदलीमागील कारण सांगितले जात आहे. त्यांच्या जागी नागपूरचे विभागीय अतिरिक्त आयुक्त २००८ तुकडीचे सनदी अधिकारी अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासह प्रशासकीय पातळीवर वचक बसविण्याचे काम त्यांना येत्या काळात करावे लागणार आहे. यात अनेक आरोप असलेल्या आरोग्य विभागाची प्रकृती सुधारावी लागणार आहे. राज्य शासनाने त्यांच्या हाताखाली अनेक  अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नवी मुंबई पालिकेतील प्रतिनियुक्तीवर आलेल्या अनेक अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपलेला आहे.

त्यामुळे त्यांच्या जागी नवीन अधिकारी येत आहेत. याशिवाय चार नवीन उपायुक्त येणार आहेत. अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील आणि महावीर पेंढारी यांच्या जागी संजय काकडे आणि सुजाता ढोले यांनी यापूर्वीच आले आहेत.

प्रशासनाची धुरा सांभाळणारे किरणराज यांनी बारामतीला पसंती दिली आहे. पदोन्नती घेत सेवा देणारे उपायुक्त चाबुकस्वार हे या जागी आले आहेत.

घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त तुषार पवार यांच्या जागी डॉ. राजेंद्र राजळे यांची नेमणूक झाली आहे. राज्य शासनाने अद्याप पदमुक्त न केलेले उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांनी गेली चार महिने पालिकेत सक्षम सेवा दिलेली आहे. कोविड रुग्णालये उभारण्यात आणि खासगी रुग्णालयांचे समन्वय साधण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

अडीच महिने दालनाशिवाय पालिकेत भटकणाऱ्या डॉ. गेठे यांना अलीकडेच तळमजल्यावर दालन देण्यात आले आहे. याशिवाय नव्याने आलेले मनोज महाले यांनी तळमजल्यावर एका कोपऱ्यात कार्यालय देण्यात आले आहे. राजेश कानडे हे उपायुक्तही नवीन कार्यभाराच्या प्रतीक्षेत आहेत. या व्यतिरिक्त उपजिल्हाधिकारी संदीपन सानप हे उपायुक्त म्हणून पालिकेत लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांची संख्या वाढल्याने पालिकेत कायमस्वरूपी असलेले अधिकारी हे बोटावर मोजण्या इतकेच शिल्लक राहिले आहेत.

काही कायम, काही बदल

पालिकेतील कायमस्वरूपी उपायुक्त अमरीश पटनिगिरे यांची अतिक्रमण घोटाळ्यात चौकशी झाली आहे. मात्र, त्याच विभागाचे ते प्रमुख आहेत. याशिवाय त्यांच्याकडे विभाग एक आणि निवडणूक विभागाची जबाबदारी आहे. मालमत्ता विभाग हा आजवर उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली ठेवला गेला होता. परंतु,  तो आता अतिरिक्त आयुक्तांच्या नजरेखाली येणार आहे. नव्याने आलेल्या अतिरिक्त आयुक्त ढोले यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली आहे.