कौटुंबिक वादातून कोपरखैरणे येथील हृदयद्रावक घटना
कोपरखरणे येथे एका महिलेने क्षुल्लक कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलत आपल्या दोन पोटच्या मुलींना गळफास देत स्वत:ही आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कोपरखरणे सेक्टर-१९मधील हरीप्रिया सोसायटीमध्ये हा प्रकार घडला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. जागृती हिरजी वाविया (३०) असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
जागृती हिचा पती हिरजी याला गुजरातमध्ये कच्छ या ठिकाणी हिराजी याचे चुलते पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभे असल्याने मतदानासाठी गावी जायचे होते. मात्र पत्नी जागृती हिचा पतीने गावाला जाऊ नये, असा हट्ट होता. जागृती हिने भाऊ दिनेश याला बोलावून घेत पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. दिनेश याने जागृतीला समजावत हिरजी याला अशा कामासाठी जावे लागेल असे समजावले. तरीही मंगळवारी पती व पत्नीमध्ये या कारणावरून भांडण झाले. मात्र पतीने पत्नीचा विरोध न जुमानता गावी जायचा निर्णय घेतला. हिरजी हा मतदानासाठी गावी गेला. या घटनेनंतर रागावलेल्या पत्नीने राहत्या घरी मुली घृविया (१) आणि वंशिका (५) यांना फाशी देत स्वत: गळफास घेत आत्महत्या केली.
सदर प्रकरणी कोपरखरणे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संभाजी कटारे करीत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली.