पनवेल महापालिकने २०४५ सालापर्यंतचा केलेल्या प्रस्तावित नियोजन आराखडय़ात ‘मेट्रो’चाही समावेश केला असून प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला पनवेल शहर मेट्रोने जोडण्यात येणार आहे. यासाठीचे विशेष काम सध्या नियोजन विभागात सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यानुसार शहरातील टपालनाका ते पनवेल रेल्वेस्थानक या दरम्यान शहराच्या मुख्य रस्त्यावरून ‘मेट्रो’ धावणार आहे. सुमारे सहा किलोमीटर अंतरापर्यंत या मेट्रोचा प्रस्तावित आराखडा बनविण्याचे पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या विचाराधीन आहे.

पनवेल शहर पालिकेच्या क्षेत्रामध्ये खांदेश्वर, कामोठे, कळंबोली व तळोजा औद्योगिक क्षेत्र तसेच खारघर या वसाहतींमध्ये ‘मेट्रो’चे जाळे उभारले जात आहे. हे नियोजन सिडको मंडळाचे आहे. पालिकेच्या शहरीभागाप्रमाणे पनवेल शहरातील नागरिकांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी ‘मेट्रो’चा पर्याय असावा अशी मागणी होत आहे. सिडको मंडळाने मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये खांदेश्वर रेल्वेस्थानक ते आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पापर्यंत मेट्रोची मार्गिका सुचविली आहे. याच मार्गिकेला कळंबोली व तळोजापर्यंत जोडले जाणार आहे. याच मार्गिकेचा चौथा टप्पा पनवेल शहरातील टपालनाकापर्यंत किंवा पनवेल रेल्वेस्थानकापर्यंत जोडला जावा असे नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सिडको मंडळ आणि राष्ट्रीय रस्ते व राज्य सरकारचे रस्ते बांधणाऱ्या विविध प्राधिकरणांकडून पनवेल शहरालगत जाणाऱ्या महामार्गाना पनवेल शहराला जोडण्याच्या हालचाली आयुक्त देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन प्राधिकरण करीत आहेत. पनवेल शहरालगत जेएनपीटी, दादरी फ्रेटकोरीडोर, विरार-पनवेल कोरीडोर, सीएसटी-पनवेल इलीव्हेटेड रेल्वेमार्ग आणि सिडकोचा मेट्रो प्रकल्प पनवेल शहर पालिकेचा भाग असल्याने पनवेलच्या भविष्यात दळणवळण सुटसुटीत व जलदमार्गिकांचे असणार आहे. मेट्रोच्या आराखडयाचा प्रारूप तयार होण्यासाठी २०१९ सालचा अंतिम महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर नगरविकास विभागाच्या मान्यतेनंतर नियोजन आराखडय़ाची अंमलबजावणी होणार आहे.

रुंद रस्ते, मल्टीपार्किंगशिवाय विकास अशक्य

पनवेलमधील अरुंद रस्ते प्रशस्त केल्याखेरीज पनवेल शहराचा विकास होणे अशक्य असल्याचे शहर नियोजनकारांनी सुचविले आहे. रस्त्यांसोबत येथील पार्किंग समस्या जिटल आहे. एकावर एक मल्टीपार्किंग योजना खासगी व सरकारी तत्त्वांवर राबविल्याखेरीज हा सामाजिक प्रश्न सुटणे अशक्य झाले आहे. इमारतींमध्ये ही सोय ठेवल्यास हा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. नवीन इमारतीचे बांधकाम करणाऱ्यांनी तळमजल्याखाली दोन मजले पार्किंगसाठी बांधल्यास रहिवाशांना वाहनांसाठी पर्याय मिळू शकेल. पनवेलमधील रस्ते बांधताना पालिका प्रशासन २०४५ सालच्या नियोजन आराखडय़ानुसार पादचाऱ्यांना व सायकलस्वारांना प्राधान्य देणार आहे. पनवेल शहरातील अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी पनवेल पालिका अनेकांचे रोष अंगावर झेलणार असल्याचे समजते