गाळमुक्त धरण योजना; एमआयडीसीच्या मंजुरीची प्रतीक्षा

उरण : उरण तालुक्यातील रानसई धरणात साठलेला गाळ काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून यासंबंधी वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून रानसईमधील गाळ काढण्याचे आदेश जिल्ह्य़ाच्या पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे उरणमधील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार असल्याचे बोलले जात असले तरी जोपर्यंत एमआयडीसीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून त्याला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत हा गाळ काढण्यातील अडथळा दूर होणार नसल्याची चर्चा आहे.

उरण तालुक्यातील २५ ग्रामपंचायती व उरण नगरपालिकेला तसेच येथील औद्योगिक विभागाला उरणच्या रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. या धरणाची सुरुवातीची पाणी क्षमता ही १० दशलक्ष घनमीटर होती ती कमी कमी होत सध्या सात दशलक्ष घनमीटरवर आली आहे. त्यामुळे एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी कमी पडू लागले आहे. ही गरज भागविण्यासाठी एमआयडीसीला नवी मुंबई पाणीपुरवठा योजनेतील हेटवणे धरणातून पाणी उसने घ्यावे लागत आहे. तसेच पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी तीन ते चार महिन्यांची पाणीकपातही करावी लागत आहे. त्यातच येथील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पाण्याची मागणी वाढू लागली आहे. ही मागणी भागविण्याचा प्रश्न एमआयडीसीकडे आहे. धरणातील पाणीसाठय़ात वाढ व्हावी याकरिता शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून रानसई धरणातून गाळ काढावा, अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्यानुसार त्यांनी एमआयडीसीला आदेश दिले आहेत. तर गाळ काढण्यासाठी उरणमधील काही समाजसेवी संस्थांनी सहकार्य करण्याची इच्छा दर्शविली आहे, अशी माहिती बालदी यांनी दिली.

पुण्यातील केंद्रीय जलविद्युत संशोधन केंद्राकडून २०१५ ला धरणातील गाळाच्या प्रमाणाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. क्षमतेच्या अर्धा टक्का गाळ असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. यासंदर्भात आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळविले आहे. त्यांची मंजुरी आल्यानंतर गाळ काढता येईल.

– सतीश पवार, उपअभियंता, एमआयडीसी