15 December 2017

News Flash

छापील किमतीची पनवेलमध्ये ऐशीतैशी

शहरात रोज लाखो लिटर दुधाची विक्री होते आणि त्यातून लाखो रुपयांची लूटमार होते.

संतोष सावंत, पनवेल | Updated: August 5, 2017 1:20 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

दूध, शहाळे, सिगारेट विक्रीत दोन रुपयांची लूट

सामान्यपणे ग्राहक कोणतेही उत्पादन खरेदी करताना त्यावरील छापील किंमत पाहतो आणि त्यानुसार पैसे देतो; मात्र पनवेलमधील दुकानदारांना हे मान्य नाही. छापील किमतीवर ते दोन रुपये ‘स्वघोषित कर’ आकारत आहेत. शहरातील सर्वच दुकानांत हा ‘नियम’ पाळला जात असल्यामुळे ग्राहकांनाही निमूटपणे ही दोन रुपयांची लूट सहन करावी लागत आहे. पालिका स्थापन झाल्यानंतर तरी शहरात कायद्याचे राज्य येईल, या आशेवर पाणी पडले आहे. सुटे किंवा पिशवीबंद दूध, शहाळे, सिगारेट या आणि अशा अनेक वस्तू विकताना रोजरोस खिसेकापूगिरी सुरू आहे.

ग्राहकांकडून छापील दरच घेतले जातील याची काळजी घेण्याची जबाबदारी वैधमापन शास्त्र विभागावर आहे. परंतु या विभागाचे पनवेलमधील दुकानदारांवर अजिबात नियंत्रण नसल्याचे दिसते. शहरात रोज लाखो लिटर दुधाची विक्री होते आणि त्यातून लाखो रुपयांची लूटमार होते. कामोठे, कळंबोली, नावडे, तळोजा व खारघर परिसरात हे नेहमीचेच झाले आहे. स्थानिक असल्याचा फायदा घेत काही दुकानदार आम्ही म्हणू, तोच दर अशी मनमानी करत आहेत. राजकीय नेतेही या समस्येकडे डोळेझाक करत आहेत. अनेक वर्षांपासून हीच स्थिती आहे, अनेकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्यानंतरही पोलिसांनी देखील कोणतीही कारवाई केलेली नाही. यासाठी स्वतंत्र विभाग असल्याचे सांगत पोलीस हात वर करत आहेत. दुकानदारांना विचारले असता, या दोन रुपयांपैकी एक रुपया स्थानिक गुंडांना द्यावा लागत असल्याचे ते सांगतात.

नावडे येथे बंद इमारतीच्या तळमजल्यावर गवळी दूध सेंटर आहे. या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र नाही. या दूध विक्री केंद्रातून प्रत्येक दूधाच्या पिशवीवर आणि म्हशीच्या सुटय़ा दुधावर अध्र्या लिटरमागे दोन रुपये जादा आकारले जात आहेत. रोडपाली येथील सेक्टर २० मधील गिरीराज एनक्लेव्ह या इमारतीच्या तळमजल्यावरील पानगादीचा मालक ८ रुपये ९० पैशांना असणारी सिगारेट ११ रुपयांना विकतो. वस्तू व सेवा करामुळे अतिरिक्त दर आकारला जात असल्याचे दुकानदार सांगतो, अशी माहिती तेजस देहरकर या ग्राहकाने दिली. शहरात ठिकठिकाणी असलेल्या या समस्येविरोधात महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षांने ब्र ही उच्चारला नाही.

पनवेलच्या वैधमापनशास्त्र विभागामध्ये दोन अधिकारी नेमले आहेत. पनवेल रेल्वेस्थानकासमोरील नर्मदा कॉम्पलेक्स या इमारतीच्या तळमजल्यावर वैधमापन शास्त्र विभागाचे कार्यालय आहे. ज्या पनवेलमध्ये रोज कोटय़वधींचे व्यवहार होतात, तिथे एस. पी. भंगाळे व रमेश मारणे हे अवघे दोन निरीक्षक आहेत. त्याव्यतिरिक् त एक लिपीक व एक शिपाई आहेत. या दोन निरीक्षकांच्या कामांचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील एस. एस. कदम यांच्यावर आहे. या तीन अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत पनवेलमध्ये रोज ही लूट होत आहे. ग्राहकांनी पुढाकार घेऊन वैधमापन शास्त्र विभागाला कळवणे गरजेचे आहे, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वैधमापनशास्त्र विभागाकडे माहितीचा अभाव

पनवेल महापालिका क्षेत्रात किती दुकाने आहेत याची आकडेवारी वैधमापनशास्त्र विभागाकडे नाही. ज्या विभागाकडे दुकाने व रस्त्यांवरील बेकायदा टपऱ्यांतील व्यवसायाची माहितीच नाही, त्या विभागातील अधिकारी बेकायदा दरवसुलीवर नियंत्रण कसे आणणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वैधमापनशास्त्र विभागाचे ‘ग्राहक हितार्थ’ हे ब्रीद पनवेलमध्ये धाब्यावर बसवण्यात आले आहे.

हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. आमचा विभाग त्यावर नक्कीच कारवाई करेल. मी स्वत या परिसरातील अधिकाऱ्यांशी बोलतो. पनवेलमध्ये मनुष्यबळ कमी असले तरी छापील दरांपेक्षा जास्त किंमत आकारणे हे नियमबाह्य़ असल्याने याच्यावर नक्कीच कारवाई करू. ग्राहकांनी dclmms@yahoo.in,dclmms_complaints@yahoo.com या इमेल आयडीवर तक्रार करावी. तत्काळ कारवाई करण्यात येईल. स्थानिक अधिकाऱ्यांनी ई-मेलद्वारे आलेल्या तक्रारींवर काय कारवाई केली, याकडे आमचे लक्ष असते.

अमिताभ गुप्ता, वैधमापन शास्त्र विभागाचे, मुख्य नियंत्रक 

पनवेलमध्ये अनेक वस्तूंवर छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारला जातो. ८ रुपयांची सिगारेट १२ रुपयांना विकली जाते. मी एकटा भांडून हा प्रश्न सुटनार नाही. यासाठी जनजागृती झाली पाहिजे. पाच रुपयांची गुटख्याची पुडी १०-१५ रुपयांना विकली जाते.

सागर कोळेकर, खांदेश्वर वसाहत

दुधाच्या एका पिशवीवर २० रुपये किंमत छापलेली असताना रोडपाली येथील दुकानदार हीच पिशवी २३ रुपयांना विकत आहेत.

संदीप तरटे, रहिवासी, रोडपाली

First Published on August 5, 2017 1:20 am

Web Title: mrp price issue in panvel milk cigarette