महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव टांगणीला

पावसाळा सुरू झाल्यानंतर सानपाडा येथे खांबावर विद्युत प्रवाह उतरल्याने स्पर्श लागून एकाचा मृत्यू झाला. गेल्या आठवडय़ात शनिवारी कोपरखरणे येथे एक महाविद्यालयीन विद्यार्थी भूमिगत वाहिनीचा स्पोट झाल्याने गंभीर जखमी झाला, तर सोमवारी कोपरी गाव येथे शॉर्ट शॉक सर्किट होत आगीचा भडका  उडाला.. अशा घटना वारंवार घडत असल्याने महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे. भूमिगत वीजवाहिन्या, नादुरुस्त वीजपेटय़ांचा धोका वाढत आहे.

उघडय़ा वीजपेटय़ा, खांबांवर लोंबकळत असलेल्या नादुरुस्त वीजपेटय़ा तसेच भूमिगत वीजवाहिन्या उघडय़ावर पडल्याचे चित्र नवी मुंबईत आहे. याबाबत महावितरण इतर प्रशासनांकडे बोट दाखवत आहे. मात्र, वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. यात आतापर्यंत अनेकांचा जीवही गेला आहे.

जुलै महिन्यात सानपाडा येथे शीव-पनवेल महामार्गावर उघडय़ा वीजवाहिनीचा विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाला स्पर्श झाल्याने सुरेश जनघरे या युवकाचा मृत्यू झाला होता. पावसाळ्यात अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांच्या शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी घणसोली गावात एका तीन वर्षीय मुलगा विजेचा धक्का लागून जखमी झाला होता. त्यानंतर याच गावात विजेच्या धक्कय़ाने एका कुत्र्याला जीव गमवावा लागला होता. तुर्भे आंबेडकरनगरमध्ये विजेचा धक्का लागून सहा शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटनाही ताजी आहे.

शनिवारी कोपरखैरणे सेक्टर ५ मध्ये भूमिगत वीजवाहिनीचा अचानक स्फोट होऊन यात शुभम जगदीश सोनी (वय २१) हा युवक जखमी झाला. तो सकाळी महाविद्यालयात जात असताना त्याच्या पॅन्टने पेट घेतला. ती विझवताना त्याचे हात भाजले. पोट, छाती आणि चेहऱ्याची कातडीही भाजली आहे. यात तो विद्रूप झाला आहे. सोमवारी कोपरी गाव सेक्टर २६ येथे रात्री ११ च्या सुमारास शॉर्ट शॉक सर्किट होऊन आगीचा भडका उडाला. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुर्दैवी घटना घडली नाही. मात्र वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिक करीत आहेत. महावितरणच्या उघडय़ा वीजपेटय़ा, भूमिगत वाहिन्यांचे झालेले निकृष्ट काम यामुळे या घटना घडत असल्याने महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महावितरणाच्या वीजपेटीजवळून किंवा रस्त्यावरून चालताना असुरक्षित वाटत आहे. कधी शॉक सर्किट  होईल हे सांगता येत नाही. महावितरणाने या भूमिगत वीजवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती वेळेत करावी व त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी घणसोली येथील राजेंद्र वाडकर यांनी केली तर कोपरखैरणे येथील नीता गायकवाड यांनी  कोपरखैरणे या ठिकाणी सिडको वसाहतीअंतर्गत चार घरांच्या वीजजोडणीसाठी छोटी वीजपेटी बसविली आहे. मात्र गेल्या १५ वर्षांपासून ती आजतागायत बदलण्यात आलेली नाही. या ठिकाणी बरीच बांधकामे झाल्याने वीजवाहिन्या उघडय़ावर अस्ताव्यस्त विखुरलेल्या असल्याचे सांगितले.

खोदकामांमुळे धोका वाढलाभूमिगत वीजवाहिन्यांचा धोका!

शहरात महानगरपालिका, एमएमआरडीए  यांच्याकडून रस्ते दुरुस्ती, गटारांची कामे यासाठी खोदकाम करताना भूमिगत वाहिन्या उघडय़ावर पडत आहेत. पाणी जात असल्याने शॉर्ट शॉक सर्किटच्या घटना घडत असल्याचे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे. भूमिगत टाकलेल्या वाहिन्या या २५ वर्षे टिकतात, परंतु असे खोदकाम केल्याने त्यांना धक्का पाहोचतो. सन २०१०, २०१५, २०१६ मध्ये गरजेनुसार भूमिगत वाहिन्या बदलण्यात आल्या आहेत.

मुळात महावितरणाच्या बऱ्याच वीजवाहिन्या नादुरुस्त असतात. मात्र इथे एकमेकांकडे बोट न दाखवता परिस्थिती कशी नियंत्रणात आणता येईल याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पालिका अधिकाऱ्यांना खोदकाम, रस्तेदुरुस्ती, नालादुरुस्ती करताना त्या भूमिगत वीजवाहिन्याना धक्का लागणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच लवकरच पालिका व महावितरण यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महानगरपालिका