कोपरखरणेतील भूमिगत वाहिनीच्या स्फोटात युवक जखमी

कोपरखैराणे सेक्टर ५ मध्ये भूमिगत वीजवाहिनीचा अचानक स्फोट होऊन यात शुभम जगदीश सोनी (वर २१) हा युवक जखमी झाला आहे. या घटनेला दोन दिवस झाले तरी पोलीस व महावितरणची चौकशी सुरू असे सांगितले जात असून महावितरण आणि पालिका एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जखमी झालेला शुभम सोनी हा वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षांत शिकत असून तो शनिवारी सकाळी महाविद्यालयात जात असताना ही घटना घडली. त्याच्या पॅन्टने पेट घेतला. ती विझवताना त्याचे हात भाजले. पोट, छाती आणि चेहऱ्याची कातडीही भाजली आहे. घटना घडली त्यावेळी गाडी धुण्यासाठी ठेवलेल्या बादलीतील पाणी त्याने प्रसंगावधान राखून अंगावर ओतून घेतले. शिवाय लोकांनीही त्याच्या कपडय़ास लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. शुभमवर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणाची कोपरखैरणे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मात्र वाहिनी कोणी टाकली? कंत्राटदार कोण? घटना निष्काळजीपणामुळे घडली की अपघात होता? याचा तपास पोलीस घेत आहेत. दुसरीकडे महावितरणकडूनही चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणर असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे येथील धोक्याबाबत रवींद्र म्हात्रे यांनी दोन वेळा महावितरण आणि कोपरखैरणे अभियांत्रिकी विभागाला कळविले होते. त्याची वेळीच दखल घेतली असती तर हा अपघात झाला नसता, असा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.

याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता दीपक जाधव यांनी नियमाप्रमाणे नुकसानभरपाई देणार आहोत. यात दोषी कोण? याची चौकशी शासनाची समिती करत आहे. नियमानुसार वाहिन्या भूमिगत आहेत. मात्र पालिकेचे गटराचे काम झाले. त्याच्यात या वाहिनीचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. तसेच गटार असल्याने त्या वाहिन्या खोलवर टाकण्यास तांत्रिक अडचणी आल्या असल्याचे सांगितले, तर पालिकेचे कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही. रस्ते बांधकाम करताना महावितरणशी समन्वय साधून केले जाते, असे सांगत हातवर केले.

माझ्या मुलाची यात काही चुकी नसताना तो विद्रूप झाला आहे. मी शेवटपर्यंत लढून न्याय मिळवून देईल. महावितरण आणि पोलीस यातील दोषी शोधत आहेत हा धक्कादायक प्रकार आहे. – जगदीश सोनी, जखमी युवकाचे वडील.