जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार
दोन वर्षांपासून पनवेलच्या देहरंग धरणातील गाळाचा साठा उपसण्याचे रखडलेले काम सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागत आहे. वहाळ येथील दारू बंदीचा निर्णय त्यानंतर तहानलेल्या पनवेलकरांच्या प्रश्नावर धरणात साचून राहिलेला गाळ उपसण्याच्या निर्णयामुळे सत्तेतल्या आणि विरोधातील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले आहे.
सुमारे सव्वा लाख लोकवस्तीचे पनवेल शहरामधील सामान्यांना एकदिवसाआड पिण्यासाठी पाणी वेळ आली आहे. अपुऱ्या पावसाच्या पाण्यामुळे आणि देहरंग धरणातील साचलेला गाळ मागील दोन वर्षांपासून न काढल्यामुळे ही वेळ पनवेलकरांवर आल्याचे जाणकारांचे मत आहे. नैसर्गिक संकटाऐवजी निर्णयाच्या ठोसपणाचा फटका पनवेलकरांना इच्छा नसताना सहन करावा लागत आहे. शहरात सध्या सुमारे ११ हजार पाणी खातेधारक असून यांना २६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. परंतु पनेवलकरांचे स्वत:च्या मालकीचे धरण असूनही पनवेलकरांना पाण्यासाठी विविध प्राधिकरणांकडून उसनवारी करावी लागते. सुमारे २७७ एकर जमिनीवर देहरंग हे धरण वसले आहे. या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ३३५७ दशलश लिटर पाण्याची असली तरीही धरणात सुमारे तीन मीटर उंचीचा मातीचा गाळ साचल्यामुळे निव्वळ २१०० दशलक्ष लिटर पाणी धरणात साचले जाते. मे महिन्याच्या अखेरीस धरण कोरडेठाक पडले असताना रायगडचे जिल्हाधिकारी शीतल उगले-तेली यांनी जलयुक्त शिवार या योजनेची अंमलबजावणी करत असताना पनवेल नगर परिषदेचा कोणताही प्रस्ताव नसताना स्वत:हून विविध विभागांशी समन्वय ठेवून धरणातील गाळ काढण्याचे काम सोमवारपासून सुरू केले. या योजनेत पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी तालुक्यामधील कंत्राटदारांना लोकसहभाचे आवाहन करून सुमारे ८० डंपर, ५ पोकलन, २ डोझर यांची मदत घेतली आणि धरणात मातीचा साचलेला गाळ उपसण्याचे काम सुरु झाले आहे. हा गाळ धरणातून काढून सरकारी जमिनीत धरणाच्या वरती एकवटला जाणार आहे. त्या भरावावर सुमारे पाच हजार रोपांची लागवड केली जाणार आहे.