रेल्वे रुळामध्ये तांत्रिक बिघाड; सलग नवव्या दिवशीही प्रवाशांचे हाल

गेल्या आठ दिवसांपासून हार्बर मार्गावरचा सावळागोंधळ शनिवारी सलग नवव्या दिवशीही सुरूच राहिला. त्यामुळे या मार्गावर सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे अखेर आज रेल्वेप्रवाशांचा संताप अनावर होऊन बेलापूर व नेरुळ स्थानकांत रेल्वेप्रवाशांनी मोटरमन तसेच गार्ड यांना घेराव घातला. प्रवासी प्रंचड वैतागल्याचे चित्र पाहायला मिळाले, परंतु रेल्वे पोलिसांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात रेल्वे प्रशासनाने प्रयत्न केला. दुपारी १२ वाजून २२ मिनिटांपासून ते जवळजवळ २ वाजून ३० मिनिटांपर्यंतच्या खोळंब्यामुळे रेल्वे प्रवाशांना रुळावरून पायपीट करावी लागल्याने चांगलेच हाल झाले.

हार्बरच्या मंदगतीचे अष्टक शुक्रवारी पूर्ण झाले असताना नवव्या दिवशीही प्रवाशांना खोळंब्याला सामोरे जावे लागले. दुपारी पनवेल ते सीएसएमटी या अप मार्गावर नेरुळ व जुईनगर स्थानकांच्या दरम्यान रेल्वेरुळाच्या पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अप व डाऊन या दोन्ही मार्गावरील गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे नेरुळ स्थानकापासून खारघर स्थानकादरम्यान अनेक गाडय़ांचा खोळंबा झाला होता. प्रवाशांना रेल्वेरुळावरून चालत जाऊन पुढील स्थानक गाठावे लागले. यादरम्यान स्थानकांदरम्यान अडकलेल्या गाडय़ांमध्ये कोणतीच उद्घोषणा होत नसल्यामुळे प्रवाशांचा पारा चढला. अखेरीस बेलापूर स्थानकात सीएसटीकडे जाण्यासाठी दोन तास खोळंबलेल्या गाडीच्या प्रवाशांनी मोटरमन व रेल्वे गार्डला घेराव घालत लाखोल्या वाहिल्या. तशीच स्थिती नेरुळ स्थानकातही पाहायला मिळाली. नेरुळ व जुईनगर स्थानकांतील तांत्रिक बिघाडामुळे अप व डाऊन मार्गावरील सावळागोंधळ झाला. रेल्वे प्रशासनाने वाशी स्थानकातून सीएसएमटीकडे जाणाऱ्या विशेष लोकल सोडण्यात आल्याची माहिती दिली. तर काही गाडय़ा पनवेल स्थानकातूनही सोडण्यात आल्या होत्या.

सातत्याने नवव्या दिवशीही कार्यालयात पोहोचायला उशीर झाल्यामुळे किती संयम ठेवायचा, असा त्रागा विशेषत: महिलांनी मोटरमनच्या घेरावावेळी व्यक्त केला.

खोळंब्याचे दिवस..

  • शुक्रवार, २२ डिसेंबर ते रविवार २४ डिसेंबपर्यंत नेरुळ उरण रेल्वेच्या कामासाठी व रेल्वे वाहतूक बेलापूर स्थानकाजवळ दुसऱ्या बोगद्यातून वळविण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला होता.
  • शनिवार, २५ डिसेंबर याच मार्गावरील कामासाठी नेरुळ ते पनवेलपर्यंतची रेल्वेवाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती.
  • मंगळवार, २६ डिसेंबर बेलापूर स्थानकात पेंटाग्राफ तुटल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली.
  • बुधवार, २७ डिसेंबर ते शुक्रवार, २९ डिसेंबर मध्यरात्री २ पर्यंत बेलापूर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला होता.
  • शुक्रवार, २९ डिसेंबरला सकाळी मध्यरात्री २ ते ७ पर्यंत नेरुळ ते पनवेल डाऊन मार्गावर तर व रात्री १२ ते ४ वाजेपर्यंत पनवेल ते नेरुळ या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल.
  • शनिवारी ३० डिसेंबर जुईनगर वे नेरुळ स्थानकांदरम्यान दुपारी १२ वाजून २२ मिनिट ते २ वाजून ३० मिनिटांपर्यंत पनवेल ते वाशी मार्गावरील वाहतूक विस्कळीत

शनिवारी नेरुळ व जुईनगर स्थानकांदरम्यान पनवेल सीएसएमटी या अप मार्गावर रेल्वेरुळामधील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. दुपारी १२.२२नंतर दोन तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाशी सीएसएमटी विशेष लोकल चालवण्यात आल्या होत्या. ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत होती.   – ए. एन. सिंह, स्टेशन मास्तर, नेरुळ रेल्वेस्थानक

ट्रान्स हार्बरही विस्कळीत

ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. पनवेलहून १.०४ मिनिटांनी सुटणारी लोकल दोन वाजले तरीही सोडण्यात आली नव्हती. हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्याच तिकिटावर ट्रान्स हार्बरमार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती.