ऐन धुळवडीच्या दिवशी नवी मुंबईतील सानपाडा येथून एका १४ वर्षी मुलीचे अपहरण झाल्याची वार्ता पसरली आणि अवघ्या शहरभर खळबळ उडाली. पोलीस यंत्रणा सतर्क करण्यात आल्या. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरून मुलीचे वर्णन, तपशील ‘शेअर’ करण्यात येऊ लागले. या मुलीचे काय होणार, या चिंतेने साऱ्यांनाच ग्रासले. पण अवघ्या तासाभरात या प्रकरणाचा पूर्ण उलगडा झाला आणि सध्याच्या पिढीतील अविचारी ‘स्मार्ट’पणाचा प्रत्यय साऱ्यांनाच आला..

सानपाडय़ातील एका सुखवस्तू कुटुंबात राहणारी ही १४ वर्षीय मुलगी परिसरातीलच एका शाळेत शिकते. परंतु, गेल्या दीड वर्षांपासून पाय दुखण्याच्या आजाराने तिला ग्रासले आहे. त्यामुळे तिचे शाळेत जाणेही कमी झाले आहे. कपडय़ाचे व्यापारी असलेले वडील व्यापारानिमित्त जास्त काळ बाहेरगावीच असतात. आई गृहिणी पण थोडय़ा जुन्या विचारांची. मुलीचे हे दुखणे तिला खटकू लागले. त्यावरून मुलीला टोमणे मारण्यास सुरुवात झाली. आधीच दुखण्याने त्रस्त आणि त्यात कुटुंबातून होणारी अवहेलना यांमुळे हताश झालेल्या मुलीची राजस्थानमधील एका मुलाबरोबर ओळख झाली. ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील चॅटिंगमधून दोघांची मैत्री दृढ झाली. रात्री उशिरापर्यंत हे संभाषण सुरू असायचे. अलीकडेच मुलीच्या आईला ही गोष्ट समजली. तिने मुलीला खडसावलेच; पण त्या मुलालाही फोन करून आपल्या मुलीपासून दूर राहण्यासाठी धमकावले.

घरात एकलकोंडेपणा सोसत असल्याने वैफल्यग्रस्त झालेली ही मुलगी मित्राशी संवाद तुटल्यामुळे अधिक निराश झाली. तिने घरातून पळून जाण्याचा बेत आखला. आपल्या ११ वर्षीय भावाकडे तिने हा विचार बोलून दाखवला. ‘मी घर सोडून चालले आहे. तू कोणाला सांगू नकोस. सांगितलेस तर मी जीव देईन’ असे सांगत तिने आपल्या भावाकडून गोपनीयतेचे वचनही घेतले. धुळवडीच्या आधी दोन दिवसांपासून तिची तयारी सुरू होती. धुळवडीच्या सायंकाळी ‘मंदिरात जाते’ असे सांगून ती भावासोबत घराबाहेर पडली. सायंकाळी साडेसहा वाजता ती जवळच्या बुद्धेश्वर मंदिरात गेली. तेथे पोहोचताच तिने भावाला घरी जाण्यास सांगितले. घरी गेल्यावर आईला ‘दीदी को किडनॅप किया है’ असे सांगण्याची सूचना तिने भावाला केली. भावानेही ठरल्याप्रमाणे घरी जाऊन आईला बहिणीचे अपहरण झाल्याची कथा ऐकवली. ‘सफेद मारुती व्हॅनमधून उतरलेल्या चौघांनी ताईचे अपहरण केले’ असे सांगताच आईचे अवसान गळाले. तिने तातडीने बाहेरगावी असलेल्या आपल्या पतीला कळवले. त्याने आपल्या ‘ओळखी’ वापरून नवी मुंबई पोलिसांवर तपासासाठी दबाव आणला. खरेतर अपहरणाची बातमी समजताच नवी मुंबई पोलिसांनी आधीपासूनच सर्व यंत्रणांना सतर्क केले होते. परिमंडळ एकचे उपायुक्त सुधाकर पाठारे आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात केली. याच काळात अल्पवयीन मुलीचे भररस्त्यातून अपहरण अशी बातमी सर्वत्र पसरली. यात समाजमाध्यमे आघाडीवर होती. त्यांनी तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करताना अल्पवयीन मुलीचे नाव, वय, शाळा, छायाचित्र सर्वच प्रसारित केले. पोलिसांवरील दबाव वाढला. काही जमावाने पामबीच मार्गावर रस्ता रोको केला. याच काळात सव्वादहा वाजता मुलगी सापडल्याची माहिती समाजमाध्यमांवरून पसरली. मुलीच्या ओळखीच्या औषधाच्या दुकानात ती आली होती. तिने औषध दुकानाच्या मालकाला आईला फोन करण्यास सांगितले. पोलीस आणि आईने औषध दुकानात येऊन तिला ताब्यात घेतले.

सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज पाडवी तोपर्यंत मुलीच्या भावाने सांगितलेल्या ठिकाणचे सर्व सीसी टीव्ही फुटेज जमा केले होते. अपहरणाच्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी आलेल्या अनुभवाचा अभ्यास करण्यात आला. खंडणी, बलात्कार आणि अंतर्गत वाद या तीन कारणांमुळे सर्वसाधारणपणे अपहरण होते. ह्य़ा तीनही शक्यता या प्रकरणात दिसून येत नव्हत्या. त्यात सीसी टीव्हीमध्ये भाऊ माघारी जाताना पदपथावरून मस्त उडय़ा मारत जात असल्याचे दिसून आले. ह्य़ा घटनेचा आजूबाजूला एकही साक्षीदार पोलिसांना मिळाला नाही. वैद्यकीय तपासणीसाठी मुलीला रुग्णालयात पाठविण्यात आल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा भावाकडे विचारणा केली. ‘तुम्हारे दीदीने तो सबकुछ बता दिया’ ही पोलिसांची गुगली कामी आली. भावाने मग सर्व हकीगत सांगितली. हा सर्व बनाव असल्याचा पोलिसांचा संशय खरा ठरला. मुलीला रुग्णालयातून आणल्यानंतर पोलिसांनी तिलाही बोलते केले. घरात होणारी घुसमट आणि मित्राबरोबर बोलण्यास करण्यात आलेली बंदी, यामुळे आपण हे सर्व केल्याचे तिने सांगितले. यावेळी आपल्या मनात आत्महत्याचे विचार देखील आले होते. नवी मुंबई पोलिसांचे नशीब बलवत्तर होते. त्यामुळे त्या मुलीचे खरे अपहरण, रेल्वे स्थानकात एकटी असताना गुर्दुल्ले, मद्यपी यांची जबरदस्ती अथवा तिची आत्महत्या असा कोणताही प्रकार न झाल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.