शनिवारपासून धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा समुद्रात लावण्यात आला होता. त्यामुळे उरण ते मुंबई दरम्यानची प्रवासी लाँच सेवा बंद करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी हा बावटा हटविण्यात आल्याने सेवा पूर्ववत झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील नोकरदारांचा द्राविडी प्राणायाम टळणार आहे.
पावसाळ्यातील चार महिने हवामान बदलानंतर ही सेवा खंडित केली जाते. उरण (मोरा) ते मुंबई (भाऊचा धक्का) दरम्यान साधी लाँच व स्पीड लाँच अशा दोन लाँच सेवा सुरू आहेत. यात साध्या लाँच सेवेला या प्रवासासाठी एक तास तर स्पीड लाँचला अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी लागतो. त्यामुळे मुंबईच्या दक्षिण भागात तसेच मंत्रालयात काम करणारे अधिकारी, कामगार व कर्मचारी हे या मार्गाने प्रवास करणे पसंत करतात. तसेच उरणमधील व्यापारी व व्यावसायिकांनाही या मार्गाने मुंबई प्रवास सोयीचा ठरतो. त्यामुळे अनेक प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. तीन दिवसांपासून हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर मंगळवारी सकाळपासून ही जलसेवा सुरू करण्यात आल्याची माहिती मोरा विभागाचे बंदर अधिकारी ए. एन. सोनावणे यांनी दिली.