प्रारूप यादीत मतदारांची नावे दुसऱ्या विभागात गेल्याच्या सर्वाधिक तक्रारी

नवी मुंबई : पालिका प्रशासनाने निवडणुकीसाठी गेल्या आठवड्यात प्रारूप मतदारयादी जाहीर केली असून त्यावर हरकतींचा पाऊस पडला आहे. मंगळवारी शेवटच्या दिवसापर्यंत सुमारे साडे तीन हजार तक्रारी आल्या आहेत. यात काही विभागातील नावे दुसऱ्या विभागात गेल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. आता हरकती आणि आलेल्या सूचनांनुसार प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी ही ३ मार्च रोजी प्रसिध्द होणार होणार असून याकडे इच्छुूकांचे लक्ष लागून आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाप्रमाणे १६ फेब्रुवारीला पालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात ९ लाखांहून अधिक मतदार असून बेलापूर मतदार संघात २९,५७० तर ऐरोली मतदारसंघात ३४,२०१असे एकूण ६३,७७१ नवीन मतदार वाढले आहेत. यावर पहिल्या दिवसापासूनच आक्षेप नोंदवला गेला आहे.

सोमवारपर्यंत १५२२ तक्रारी पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. मंगळवारी शेवटच्या दिवशी ३ हजार ३९५ पालिकेकडे आल्या असल्याची माहीती अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी दिली. यानुसार आता प्रभागनिहाय मतदार यादी ३ मार्च रोजी र्अंतम होणार आहे.  गेल्या वर्षीही ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी प्रारूप मतदार यादीवर सुमारे अडीच हजार तक्रार आल्या होत्या. यावर्षी यात दुपटीने वाढ झाल्याचे दिसत आहे.

आशीष शेलार यांची ‘एसआयटी’ चौकशीची मागणी

नवी मुंबई : मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून नवी मुंबईत प्रारूप मतदार याद्यांत फेरफार केल्याचा आरोप करीत या प्रकाराची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, अशी मागणी आमदार आशीष शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.

मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात मंगळवारी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी महामंत्री श्रीमंत भारती, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्याय, विश्वास पाठक यांच्यासह नवी मुंबई संघटन प्रभारी संजय उपाध्याय, जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.  ही फेरफार कोणत्या अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत केली व ज्यांनी केली त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी केली आहे.

नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत. त्याअनुषंगाने त्याची चैकशी करून कार्यवाही होणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक मतदार हे मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.  एकूण ९०४ व्यक्तींच्या स्थलांतरित मतदारांच्या पंचनाम्याची यादी उपजिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे यांच्यासह मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिली आहे.