सीवूड्स सेक्टर ५० आणि कोपरखैरणे सेक्टर-११ येथे महापालिकेने दोन वर्षांपासून ‘सीबीएसई’ शाळा सुरू केल्यानंतर आता महापालिका इतिहासात प्रथमच पालिकेच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाची दारे खुली होणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या सध्या ५५  प्राथमिक शाळा आहेत. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत व गुणवत्तापूर्वक उच्च शिक्षणाची संधी मिळण्यासाठी माध्यमिक शाळा सुरू केल्या.महापालिकेच्या या १९ माध्यमिक शाळांमध्ये चांगले शिक्षण दिले जात असून माध्यमिक शिक्षण प्राप्त झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे उच्च माध्यमिक घेता यावे यासाठी नव्या शैक्षणिक वर्षांपासून महापालिका कनिष्ठ महाविद्यालय सुरू करणार आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

माध्यमिक शाळांमधून उत्तीर्ण होणाऱ्या पालिकेच्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात. शहरातील खासगी महाविद्यालयातील शुल्क त्यांना परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी हे शाळाबाह्य़ ठरतात. त्यामुळे अशी गरीब आणि वंचित       मुले शिक्षणापासून दूर राहू नयेत यासाठी कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णयाच्या ११ जून २००९ अन्वये नवी मुंबई महापालिका माध्यमिक शाळा कातकरीपाडा राबाडे या शाळेस २००८-०९ पासूनच स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षांपासून हे कनिष्ठ महाविद्यालय सुरू होणार असून प्रथम ११ वी इयत्तेचे वर्ग सुरू करण्यात येतील. नव्या शैक्षणिक वर्षांपासून महापालिकेच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी नितीन काळे यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिकेत सर्वाना शिक्षण मिळाले पाहिजे व दुर्बल व वंचित घटक शाळाबाह्य़ राहणार नाही यासाठी कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. सीबीएसई शाळानंतर कनिष्ठ महाविद्यालयालाही चांगला प्रतिसाद मिळेल.-  सुधाकर सोनावणे, माजी महापौर