24 November 2020

News Flash

शंभर कर्मचाऱ्यांना धक्का

प्रशासनाला शिस्त लावताना १०२ कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी आक्रमक; तळ ठोकून बसणाऱ्या १०५ जणांच्या बदल्या; विभाग अधिकारीही रडावर

माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यापेक्षा अतिशय वेगळी कार्यशैली असलेले शांत व संयमी नवी मुंबई पालिका आयुक्त मागील आठवडय़ापासून आक्रमक झाले आहेत. लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिल्यानंतर महानगरपालिकेत एकाच जागेवर वर्षांनुवर्षे तळ ठोकून बसणाऱ्या १०५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून चांगलाच धक्का दिला आहे. यातील ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे मंगळवारी आदेश दिले असून ७० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे बुधवारी आदेश निघणार आहेत. पुढील काळात विभाग अधिकारीही त्यांच्या रडावर आहेत.

दीड वर्षांपूर्वी पालिकेत आलेले आक्रमक आयुक्त मुंढे यांच्यामुळे सर्व नगरसवेकांसह कर्मचारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. मुंढे मुख्यालयात अथवा वॉक विथ कमिशनर कार्यक्रमाला पोहचण्यापूर्वी अधिकारी, कर्मचारी अर्धा तास लवकर उपस्थित राहात होते. मुंढे यांच्यासमोर नागरिकांनी जाहीर समस्या मांडू नये यासाठी काही अधिकारी ती समस्या मांडण्यापूर्वीच सोडविण्याचे आश्वासन त्या नागरिकांना देऊन मोकळे होत होते. काही समस्या हातोहात सोडविल्याही जात होत्या. राजकीय वाद आणि प्रशासनाबरोबरचा संघर्ष यामुळे मुंढे यांना दहा महिन्यात सरकारला नारळ द्यावा लागला.

त्यानंतर आलेले आयुक्त डॉ. रामास्वामी म्हणजे मुंढे यांच्या पूर्णपणे विरोधी व्यक्तिमत्त्व मानले जाते. त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधींसह कर्मचारी, अधिकारी गृहीत धरू लागल्याने आयुक्त आता आक्रमक होत आहेत. प्रशासनाला शिस्त लावताना १०२ कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचाही निर्णयही  घेणार आहेत.  त्यानंतर त्यांनी वर्षांनुवर्षे पालिकेत तळ ठोकून बसलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे. पालिकेत आठ विभागात २३५ कर्मचारी लिपिक पदावर कार्यरत आहेत. यापैकी ३५ जणांच्या बदल्या आधीच केल्या असून मंगळवारी १०५ जणांच्या बदलीच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. उर्वरित १०० लिपिकांची बदली मार्चनंतर करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या कर्मचाऱ्यांवर राजकीय वरदहस्त अल्याने एकाच जागेवर एवढा काळ टिकल्याचे बोलले जात आहे. याच बरोबर प्रत्येक प्रभागातील विभाग अधिकारी यांच्याकडे असलेला अतिरिक्त कार्यभारही ते काढून घेण्यात येणार आहे.

महिन्याचे मानधन थांबवण्यात येणार!

महानगरपालिकेत एकूण २२०० ते  २३०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. पुढील कालावधीत शिपाई ते अधिकारी, प्रशासन, अतिक्रमण विभाग, आरोग्य विभाग, इतर विभागांतील कर्मचारी अधिकारी यांच्या बदल्या होणार आहेत. या वेळी एका विभागात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्यांची बदली करण्यात येणार आहे. तसेच बदली करून दिलेली कामे न करता मनमानी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जरब बसण्यासाठी त्यांचा दिलेला कार्यभार आणि कुठे काम करीत आहेत, याचा तपशील आयुक्तदरबारी जाणार आहे. जबाबदारी पार न पडणाऱ्यांचे महिन्याचे मानधन थांबवण्यात येणार आहेत. जो नेमून दिलेल्या चौकटीत काम करणार त्यालाच त्याचे मानधन दिले जाणार आहे.

पुढील वर्षीपासून त्रैवार्षिक बदली

यंदा एकाच जागेवर पाच वर्षांचा निकष ठेवून बदली करण्यात येणार आहेत, तर पुढील वर्षी १ एप्रिलपासून तीन वर्ष ग्राहय़ धरून आपोआपच बदली होईल तशी तरतूद केली जाणार आहे.

‘टॉक विथ’ कमिशनर

मुंढे यांनी राबवलेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ला नवी मुंबईकरांनीही चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे या आयुक्तांनी नागरिकांशी सुसंवाद साधण्याच निर्णय घेतला असून ‘टॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम हाती घेतला आहे. शनिवारी बेलापूर कार्यालय येथे सुसंवाद करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या असून बुधवारी ऐरोली येथे समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. नागरिकांनी टोकन देवून अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष माहिती ते घेणार आहेत.

मी नागरिकांना बरोबर घेऊन वॉक करत नाही तर समस्या सोडवण्याकडे लक्ष देत आहे. त्यांनी जास्तीत जास्त समस्या मांडाव्यात. चांगल्या सूचनाही कराव्यात. आंम्ही पाहणी करून त्या समस्येचे निराकरण करणार आहोत.

– डॉ. रामास्वामी, आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2018 3:03 am

Web Title: municipal commissioner dr ramaswami aggressor
Next Stories
1 बाजारात राज्यस्थानी साज!
2 मुख्यमंत्र्यांची स्वप्नपूर्ती अशक्य
3 एनएमएमटीची रात्रसेवा महागली
Just Now!
X