नागरिकांच्या अडचणी १५ दिवसांत सोडविणार
सीबीडी सेक्टर-१५ येथील सागर विहार येथे ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमांतर्गत पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट संवाद साधला. या वेळी नागरिकांना दैनंदिन स्वच्छता, पाणीपुरवठा, बांधकाम, विद्युत आणि अतिक्रमण अशा विविध विषयांवर तक्रारी आणि सूचना मांडल्या. त्यावर आयुक्तांनी विद्यमान यंत्रणा आणि व्यवस्थापन यामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी ७ ते १५ दिवसांत दूर करणार असल्याचे स्पष्ट करत ज्या सूचना संकल्पना धोरणात्मक बाबींच्या आहेत. त्यावर विचार करून योग्य कार्यवाही करणार असल्याची स्पष्ट केले.
नवी मुंबईकरांना २४ तास समाधानकारक पाणीपुरवठा होणार असे स्पष्ट करीत त्या दृष्टीने पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले जाणर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घनकचरा व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले जात असून यामध्ये नागरिकांचा संपूर्ण सहयोग अपेक्षित असल्याचे त्यांनी आवाहन केले. नागरिकांनी कचरा निर्माण होतो. तेथेच ओला व सुका असा वेगवेगळा ठेवावा तसेच सोसायटय़ांनाही तो महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाकडे देताना ओला कचरा हिरव्या डब्यात साठवून तसेच सुका कचरा निळया डब्यात साठवून वेगवेगळा द्यावा असे स्पष्ट केले. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी विविध माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना अशा प्रकारे कचरा वर्गीकरणाचे आवाहन करीत आहेत. असे सांगत महापालिका आयुक्तांनी ज्या सोसायटय़ा याबाबत सहकार्य करणार नाही. त्याच्याविषयी कठोर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले. तर नागरिकांच्या शहराविषयी, आपल्या विभागाविषयी काही संकल्पना असतात त्या जाणून घेऊन त्यांचा समावेश नियोजनामध्ये नक्की करता येईल, असे सांगत पालिका आयुक्तांनी यापुढील काळात तक्रार निवारण प्रणाली अधिक सक्षम आणि इंटरनेट, पत्रव्यव्हार, प्रत्यक्ष भेटी अशा सर्वच माध्यमांतून नागरिकांशी सुसंवादी करण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाईल असे स्पष्ट केले.