News Flash

‘एनएमएमटी’चा तोटा दोन कोटींवर

आधीच तोटय़ात सुरू असलेल्या नवी मुंबई महानगर परिवहन उपक्रमाची चाके दिवसेंदिवस पंक्चर होत आहेत

संग्रहित छायाचित्र

‘बेस्ट’ तिकीट दरकपातीचा फटका; पालिका प्रशासनाच्या उपाययोजना कागदावरच

संतोष जाधव, नवी मुंबई

आधीच तोटय़ात सुरू असलेल्या नवी मुंबई महानगर परिवहन उपक्रमाची चाके दिवसेंदिवस पंक्चर होत आहेत. तोटा भरून काढण्यासाठी आखलेल्या उपाययोजना कागदावरच असून ‘बेस्ट’ तिकीट दरकपातीमुळे दिवसाला सरासरी ३ लाखांचा तोटा सहन करावा लागत असून प्रवासी संख्येतही २० हजारांची घट झाली आहे. ऑगस्टमध्ये हा तोटा महिनाअखेपर्यंत १ कोटी ७५ लाखांपर्यंत पोहचणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये वातानुकूलित आणि सर्वसाधारण अशा ४८५ बस आहेत. त्यापैकी ४१५ बस दररोज रस्त्यावर धावतात. ७५ मार्गावर दररोज १ लाख २६ हजार ६९९ किलोमीटरचा त्यांचा प्रवास होत आहे. ‘एनएमएमटी’च्या या बसेसमधून दररोज सुमारे २ लाख १० हजार प्रवासी प्रवास करतात.

‘एनएमएमटी’ला सातत्याने पालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यात ‘बेस्ट’च्या तिकीट दरकपातीची भर पडली आहे. त्यामुळे दिवसाला सरासरी २० हजार प्रवासी कमी झाले असून ३ लाखांचे उत्पन्न कमी झाले आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या परिस्थितीचा आढावा घेत तोटय़ातल्या मार्गाबाबत पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अद्याप या संकटावर कोणतेही ठोस नियोजन होताना दिसत नाही.  पालिका महिन्याला परिवहन उपक्रमाला अंदाजे ५ कोटी ५० लाख अनुदान देत आहे. यात परिवहनचा डोलारा चालविणे कठीण बनले असताना आता ‘बेस्ट’ फटका वाढल्याने उपक्रमाची धडधड वाढली आहे.

‘एनएमएमटी’चे साध्या बसला ६ किलोमीटरच्या टप्प्यातील प्रवासासाठी ११ रुपये आकारले जातात तर ‘बेस्ट’ने पहिल्या ५ किलोमीटरसाठी ५ रुपये तिकीट दर ठेवला आहे. निम्मा फरक पडल्याने प्रवासी ‘बेस्ट’ला पसंती देत आहेत. यावर काही निर्णय न घेतल्यास पुढील काळात प्रवाशी संख्या आणखी कमी होऊ शकते. पासधारकांनीही पाठ फिरवली आहे. यामुळे एनएमएमटीची चाके पंक्चर होताना दिसत आहेत. नवी मुंबई तसेच ठाणे या शहरातूनही ‘बेस्ट’चे प्रवासी वाढले आहेत, असे ‘बेस्ट’चे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोमाने यांनी सांगितले.

  • ‘एनएमएमटी’चे प्रवासी २० हजाराने कमी झाले असून दररोजचे उत्पन्न ३८ लाखांवरून ३५ लाखांवर आले आहे.
  • दिवसाला ३ लाखांचा तोटा होत असून महिन्याला १ कोटीचा तोटा सहन करावा लागत आहे.
  • याबाबत आयुक्तांशी चर्चा झाली आहे. योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल.-शिरीष आरदवाढ, व्यवस्थापक, एनएमएमटी व्यवस्थापक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 2:15 am

Web Title: municipal corporation nmmt best transport
Next Stories
1 गणपती आगमनापूर्वी खड्डेदुरुस्ती
2 बेकायदा जोडरस्ता घातक
3 नवी मुंबईकरांच्या डोळ्यात धूळफेक?
Just Now!
X