उरण नगरपालिकेच्या विकासासाठी शासनाकडून निधी आणण्याचे प्रयत्न सुरू असून येत्या महिनाभरातच उरणमधील टाऊन हॉल व शहरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांसाठी एकूण ५२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती उरणच्या नगराध्यक्षांनी दिली आहे. त्यामुळे उरणमधील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. शहरातील टाऊन हॉल नादुरुस्त झाल्याने गेली अनेक येथील नागरिकांना मनोरंजनाच्या सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. तसेच पावसाळ्यातील रस्त्याच्या नादुरुस्तीमुळेही त्रास सहन करावा लागत आहे.
उरण नगरपालिकेचे वार्षिक बजेट अवघे तीन कोटी रुपये आहे. दोन ते अडीच किलोमीटरच्या परिघात वसलेल्या या नगरपालिकेतील रस्ते पावसाळ्यात खड्डेमय होतात. यावर उपाय म्हणून उरणचे नगराध्यक्ष महेश बालदी यांनी एमएमआरडीएकडून रस्त्याच्या विकासासाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. उरण शहरातील सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम या निधीतून करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर येणाऱ्या पाण्यामुळे होणाऱ्या खड्डय़ाची समस्या दूर होणार आहे, तर उरण शहरातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी १९९६ साली नगरपालिकेने राजीव गांधी टाऊन हॉल बांधला होता. हॉलचे छत गळू लागले आहे. तसेच इमारतही नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे उरणमधील नागरिकांसाठी असलेले मनोरंजनाचे एकमेव ठिकाणही बंद पडले आहे. या टाऊन हॉलच्या जागी व्यावसायिक गाळे असलेले सभागृह उभारले जाणार आहे.