८५ जणांना सामावून घेण्यास पालिकेच्या शिक्षण विभागाचा नकार

नवी मुंबई नवी मुंबई पालिका शिक्षण विभागाच्या मागणीनुसार जिल्हा परिषदेच्या ८५ शिक्षकांना ठाणे जिल्ह्य़ातून कार्यमुक्त करून पालिकेकडे पाठविले असून त्यांना सेवेत सामावून घेण्यास शिक्षण विभागाने चक्क नकार दिला आहे. त्यामुळे भावी पिढी घडविणारे शिक्षक गेली आठ दिवस पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ‘कोणी सामावून घेता का, सामावून?’ असा सवाल करीत अघोषित धरणे धरून बसलेले आहेत.

राज्यातील काही प्रमुख शहरांतील जिल्हा परिषद व पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती चिंताजनक असताना नवी मुंबई पालिकेच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या चांगली आहे. वाढते नागरीकरणामुळे या शहरात नशीब आजमवण्यास येणाऱ्यांच्या संख्या जास्त आहे. त्यामुळे गरीब पालकांच्या पाल्यांची संख्याही वाढत असून पालिकेच्या शाळांची विद्यार्थी संख्या ३० हजारांच्या घरात गेलेली आहे. त्यासाठी पालिकेच्या सेवेत असलेल्या शिक्षकांची संख्या अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे पालिकेच्या शिक्षण विभागाने नव्याने भरती करण्याऐवजी दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडे असलेल्या अतिरिक्त शिक्षकांना समायोजन योजनेअंतर्गत मागून घेतले होते. जिल्हा परिषदेने अशा ८५ शिक्षकांना २३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून कार्यमुक्त करून पालिकेकडे पाठविले आहे. यात ६२ मराठी विषय शिकविणारे तर इतर शिक्षक अमराठी विषय शिकविणारे आहेत. गेली पंधरा ते सोळा वर्षे जिल्हा परिषदेत शिकविण्याचे कार्य करणारे शिक्षक मागील आठवडय़ात पालिकेच्या शिक्षण विभागात येऊन नवीन शाळेचा पत्ता विचारू लागले आहेत. तेव्हा त्यांना पालिकेच्या शिक्षण विभागातून हुसकावून लावण्यात आले. प्रथम सर्व शिक्षणाची कागदपत्रे जमा करू त्यानंतर आदेश आल्यानंतर सेवेत रुजू करून घेतले जाईल, अशी उत्तरे दिली गेली. जिल्हा परिषदेची नोकरी गेल्याने आणि पालिका स्वीकारत नसल्याने या शिक्षकांची स्थिती न घर का ना घाट का अशी झाली आहे. गेले आठ दिवस हे शिक्षक पालिकेच्या बेलापूर येथील मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील दोन कारंज्याजवळ बसत आहेत.

नवी मुंबई पालिकेच्या मागणीनुसार नियुक्तीचे आदेश झालेले आहेत. शिक्षकांची आवश्यकता नव्हती तर मागणी का केली गेली. गेले आठ दिवस आम्ही आज सामावून घेतील, उद्या घेतली या आशेवर इथे येऊन बसतोय पण पालिकेच्या शिक्षण विभागाला पाझर फुटलेला नाही.

– गणेश विठ्ठल गढरी, शिक्षक

नवी मुंबई महापालिकेने अतिरिक्त शिक्षकांची मागणी केली होती. परंतु याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून या शिक्षकांना सामावून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

संदिप सांगवे, शिक्षण अधिकारी, नवी मुंबई