उद्यान अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या तर रुग्णालयांत कामबंद

नवी मुंबई : वारंवार मागणी करूनदेखील योग्य सुविधा व वेतन मिळत नसल्याने महापालिकेच्या कामगारांनी उद्यान अधिकारी यांच्या दालनात व पालिका रुग्णालयांत ठिय्या आंदोलन केले, तर रुग्णालयांतील सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त हजारो कोटींची नागरी कामे करीत आहेत, दुसरीकडे करोना महामारीच्या काळात नागरिकांना सुविधा पुरविणाऱ्या कामगारांना मात्र उपाशीपोटी, पावसात भिजून काम करावे लागत असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे.

पावसाळा सुरू झाला असून अद्यापही कामगारांना रेनकोट, गमबूट देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कामगारांना पावसात भिजून काम करावे लागत आहे. कामगारांना जेवणासाठीची जागा उपलब्ध नसल्यामुळे हाल होत आहेत. तसेच रुग्णालयातील साफसफाई कामगारांना देखील अद्याप वेतन मिळालेले नाही. भविष्य निर्वाह निधीत गोंधळ आहे. ठेकेदार बदलल्यामुळे जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नाही. त्यामुळे रुग्णालयांतील कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे.

उद्यान विभागातील एकूण ५१२ कामगारांची साधारण ३ कोटी रुपयाची देणी शिल्लक आहेत.  ठेकेदाराचा ठेका संपुष्टात आला असून उद्यान ठेकेदाराने महापालिका पैसे देत नाही, अस म्हणत हात वर केले आहेत. विष्णुदास भावे नाटय़गृहातील कामगारांना दोन महिने वेतन मिळालेले नाही. त्यांची उपासमार होत आहे. एकूणच गरीब कामगारांचे वेतन आणि इतर समस्यांवर हेतुपरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा या कामगारांचा आरोप आहे.

कामगारांच्या वेतन, सुविधा न मिळणे, या समस्यांकडे जर महापालिका आयुक्तांनी लक्ष दिले नाही तर सर्व कामगारांसहित आंदोलन करावे लागेल. पुढे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस महापालिका प्रशासन जबाबदार असेल .

-मंगेश लाड, सरचिटणीस, समता कामगार संघटना.