विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे ४९ नगरसेवक फुटल्याने पालिकेची सत्ता हाती आलेल्या भाजपमध्ये पालिका निवडणुकीपूर्वी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील भाजपचे दोन आमदार मोठय़ा मताधिक्याने निवडून आले असले तरी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या ४९ पैकी १२ नगरसेवकांचा जीव घुटमळत आहे. ते शिवसेनेत जाण्यास इच्छुक आहेत. राज्यातील सत्तास्थापनेनंतर हे नगरसेवक मातोश्रीचे दर्शन घेणार आहेत. नवी मुंबईतील शिवसेनेचा एक नेता या नगरसेवकांच्या संपर्कात आहे.

गेली २० वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या नवी मुंबई पालिकेतील मातब्बर गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर पक्षाच्या अमलाखाली गेली. विधानसभा निवडणुकीपूर्वी नाईक यांनी आमदार चिरंजीव संदीप नाईक यांच्यासह ४९ नगरसेवकांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीत केवळ दोन नगरसेवक राहिले आहेत. यातील राष्ट्रवादीची पालिकेतील अवस्था केविलवाणी झाली आहे.

भाजपमध्ये जाताना नाईक यांना नगरसेवकांची साथ आणि कार्यकर्त्यांचे निवडणुकीसाठी बळ आवश्यक होते. नाईक आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक असे एक नाते गेली २० वर्षे तयार झाले होते. त्यामुळे नाईक यांच्याप्रति असलेल्या निष्ठेखातर अनेक जण भाजपमध्ये जाण्याची इच्छा नसताना अनेक नगरसेवक गेलेले आहेत. सहा महिन्यांनी पालिकेची निवडणूक होणार आहे. यावेळची निवडणूक ही पॅनल पद्धतीने होणार आहे. त्यामुळे आजुबाजूच्या तीन प्रभागांतील मतदारांवर उमेदवारांना अवलंबून राहावे लागणार आहे. यासाठी एकाच पक्षाचे हे उमेदवार असल्यास एकमेकांची ताकद कामी येणार आहे. नवी मुंबईत शिवसेनेचे ३८ नगरसेवक आहेत. राज्यातील सत्ताकारणात नवीन समीकरणे दिसून येत आहेत. या घडामोडींवर येथील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे. भाजपची सत्ता आल्यास भाजपमध्ये कायम राहून पालिकेतील निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी या उमेदवारांनी केली आहे, तर शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्यास भाजपमधून  शिवसेनेत उडी मारणाऱ्यांची संख्या जास्त आहे. नाईक यांच्यासोबत भाजपमध्ये जाण्यास तयार नसलेले १२ नगरसेवक असून ते  शरद पवार यांच्या भेटीला मुंबईत गेले होते. भाजपमध्ये गेलेले सीबीडीतील दोन नगरसेवक स्वगृही जाणार आहेत. दिवाळीपासून अनेक उमेदवारांनी  धान्य वाटपाने निवडणुकीला सुरुवात केली आहे. काँग्रेसमध्ये अगोदरच फूट पडली असून दहापैकी चार नगरसेवकांनी भाजपची वाट चोखळली आहे.

विधानसभेचे पडसाद

विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता सोपानावर चढण्यासाठीची समीकरणे नेमकी कशी असतील, याचा अंदाज येत नसल्याचे स्पष्ट झाले. त्याचे पडसाद आता नवी मुंबई पालिकेवर उमटणार असून अनेक बदल होणार आहेत. यात भाजपची दोन महिन्यांसाठी झालेल्या बहुमतामध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. केवळ सहा नगरसेवक असलेल्या भाजपमध्ये राष्ट्रवादीच्या ४९  नगरसेवकांची  कुमक आल्याने ही संख्या ५५ झाली आहे. पाच अपक्षांची सत्ताधारी पक्षाला साथ आहे. त्यामुळे ही संख्या ६० इतकी होते.