पालिका आयुक्ताच्या आदेशानंतर कामाला गती

यावर्षी शहरात खड्डे दिसणार नाहीत असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते. मात्र शहरात जगोजागी खड्डे दिसत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्तांनी सोमावारी बैठक घेत अधिकाऱ्यांना याचा जाब विचारात गणपती आगमनापूर्वी खड्डे दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला वेग आला असून पुढील चार-पाच दिवसांत ‘खड्डय़ांचे विघ्न’ दूर होणार आहे.

नवी मुंबईत या वर्षी देखभाल दुरुस्तीच्या वार्षिक कामामुळे पावसाळ्यात खड्डे पाहायला मिळणार नसल्याचे आश्वासन शहर अभियंता विभागाने दिले होते. परंतु सततच्या जोरदार पावसामुळे कंत्राटदारांकडून दुरस्ती न केल्यामुळे शहरात खड्डेदर्शन होत आहे. मुख्य रस्त्याबरोबरच मूळ गाव-गावठाणांमध्येही रस्त्यावर खड्डे पडले आहेत. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीमध्येही याचे पडसाद उमटले होते.

सोमवारी पालिका आयुक्तांनी पालिका मुख्यालयात शहर अभियंता विभाग तसेच परिमंडळ १ व २च्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी गणरायाच्या आगमनापूर्वी खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानंतर दुरुस्तीच्या कामाला गती मिळाली आहे. पावसाचा अंदाज घेत कामे सुरू आहेत. गणेशोत्सवात नागरिकांना खड्डय़ांच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे.

परिमंडळ २ मधील खड्डे दुरुस्तीचे काम योग्य पद्धतीने सुरू झाले असून उपायुक्तांना समज देण्यात आली आहे. याबरोबरच झाडांच्या फांद्यांची छाटणी, स्वच्छता व विसर्जन तलावावरील कामांचे आदेशही देण्यात आले आहेत. खड्डे दुरुस्तीनंतर वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत रस्त्यांची पाहणी करण्यात यावी, असे आदेश दोन्ही उपायुक्तांना देण्यात आले आहेत.– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई महापालिका