पर्यटकांचे आकर्षण असलेल्या उरण तालुक्यातील नागावचा समुद्रकिनारा पावसाळ्यातील महाकाय लाटांमुळे उद्ध्वस्त झाला आहे. या किनाऱ्यावरील नारळी-पोफळीची व सुरूची झाडे उन्मळून पडू लागल्याने समुद्राच्या लांटाचा धोका या परिसरातील शेती, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी तसेच नागरिकांनाही पोहोचण्याची शक्यता आहे. नागावच्या पिरवाडी किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. याची दखल घेत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने चार कोटी रुपये खर्च करून बंधारा बांधण्याची निविदा काढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात या किनाऱ्याची धूप थांबण्यास मदत होणार आहे.

नागावचा किनारा हा मुंबई, नवी मुंबई तसेच पनवेलसह रायगड जिल्ह्य़ातील पर्यटकांना खुणावतो आहे. एक दिवसाचे पर्यटनस्थळ म्हणून शेकडो पर्यटक नागाव किनाऱ्यावर येऊ लागले आहेत. सुट्टीच्या दिवशी तर या किनाऱ्यावर गर्दी उसळते. त्यामुळे येथील स्थानिकांना काही प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत आहेत. तसेच अनेकांनी मुंबईतील तसेच इतर ठिकाणच्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्थानिकांनी हॉटेल्सही बांधले आहेत. समुद्रातील अतिक्रमणामुळे समुद्राच्या लाटांची पातळी वाढली असल्याने या किनाऱ्याची गेली अनेक वर्षे धूप होत आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील शेकडो वर्षांची नारळी-पोफळींची व सुरूची झाडे उन्मळून पडली आहेत. या लाटांमुळे किनाऱ्यावरील स्मशानभूमीही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तसेच आसपासच्या गोडय़ा पाण्याच्या विहिरींवरही परिणाम होऊ लागला आहे. येथील शेतीतही खारे पाणी शिरू लागल्याने भाजीचे पीक असलेल्या शेती उत्पादनावरही परिणाम होऊ लागला आहे. या संदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अभियंता एम. एस. मेतकर यांनी नागाव किनाऱ्यासाठी ४ कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आल्याचे सांगितले. या प्रस्तावाला हार्बर अभियंत्यांची मंजुरी मिळताच नागाव बंधाऱ्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू होईल असे ते म्हणाले.