News Flash

‘नैना’ला कोंढाणेचा आधार

पनवेलपासून ३० किलोमीटर लांब असलेल्या या धरणाची पाणी साठवण क्षमता ३३० दशलक्ष लिटर आहे.

कर्जतमधील धरण सिडकोला देण्यास राज्य सरकार अनुकूल; परिसराचा पाणीप्रश्न सुटणार

जलसंपदा विभागातील सिंचन घोटाळ्यामुळे पेण तालुक्यातील बाळगंगा धरणाच्या पाण्यावर सिडकोने पाणी सोडले असून नैना क्षेत्राला भविष्यात लागणाऱ्या पाण्याची तजवीज करण्यासाठी शासनाकडे कर्जतमधील कोंढाणे धरण मागितले आहे. राज्य शासनानेही हे धरण देण्याची तयारी दर्शवली असून मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पनवेलपासून ३० किलोमीटर लांब असलेल्या या धरणाची पाणी साठवण क्षमता ३३० दशलक्ष लिटर आहे.

खालापूर येथील मोरबे धरणातून दररोज मिळणाऱ्या ३३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठय़ावर नवी मुंबई पालिका क्षेत्रातील रहिवाशांची तहान भागवली जाते, मात्र खारघर, पनवेल, कामोठे, कळंबोली व उरण या दक्षिण नवी मुंबईतील रहिवाशांची पिण्याची गरज पूर्ण करताना सिडकोला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या हेटवणे धरणातून १०० दशलक्ष लिटर व मोरबे धरणातून ४० दशलक्ष लिटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. दक्षिण नवी मुंबईतील वाढते नागरीकरण, नियोजित विमानतळ आणि नैना क्षेत्रातील भविष्यातील विकास पाहता या भागाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे सिडकोला आवश्यक वाटू लागल होते. त्यामुळे पेण तालुक्यातील बाळगंगा धरणाच्या विकासासाठी राज्य शासनाच्या आदेशाने सिडकोनुसार सुमारे १२०० कोटी रुपये अग्रिम रक्कम दिलेली आहे, मात्र राज्यातील जलसिंचन घोटाळ्यात या धरणाचा वाढलेला खर्च अधोरिखित झाल्याने हे काम सध्या ठप्प आहे. त्यामुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्याची तजवीज करण्यासाठी करण्यात आलेली आर्थिक मदत अनिश्चित काळासाठी अडगळीत पडली आहे. परिणामी सिडकोने दुसऱ्या जलस्रोतासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यात कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाचा प्रस्ताव समोर आला आहे.

सिडकोने कोंढाणे धरणाची मागणी दोन वर्षांपूर्वी केली होती. त्याला जलसंधारण विभागाने हिरवा कंदील दाखविला असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत हे धरण सिडकोला देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या मातीच्या धरणावर जलसंधारण विभागाने आतापर्यंत ९५ कोटी रुपये खर्च केले आहेत. ते सिडको देण्यास तयार आहे. त्यानंतर सिडको हे संपूर्ण धरण विकसित करणार असून त्यावर कोटय़वधी रक्कम खर्च केली जाणार आहेत. सिडकोने या खर्चाचे अंदाजपत्रक अद्याप तयार केलेले नाही. शहर विकसित करणारी सिडको स्वतंत्रपणे प्रथमच धरण बांधणार आहे. या धरणातील पाणी नवी मुंबईपर्यंत आणण्यासाठी वेगळी जलवाहिनी टाकली जाणार आहे. या धरणामुळे सिडकोच्या नैना या पथदर्शी प्रकल्पाला लागणारा पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकेल. याशिवाय नवी मुंबई विमानतळ आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुष्पकनगर वसाहतीचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

नैना क्षेत्र, विमानतळ, प्रकल्पग्रस्तांची नवीन वसाहत व त्यांना भविष्यात लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तरतूद आत्तापासून करावी लागणार आहे. सिडकोने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार या भागाला ९५० दशलक्ष लिटर पाणी लागणार आहे. सिडकोने प्रयत्न सुरू केले असून कोंढाणे धरण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संजय चौधरी, मुख्य अभियंता, सिडको

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 2:49 am

Web Title: naina project nmmc water resources department state govt
Next Stories
1 सेल्फी पाठवा.. करसवलत मिळवा!
2 प्रशासकीय अनास्थेचे बळी
3 पोलीस संरक्षणात विमानतळाची कामे
Just Now!
X