लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : विमानतळ प्रभावित क्षेत्रात (नैना) भविष्यात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने सिडकोकडे तीन वर्षांपूर्वी हस्तांतरित केलेले कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाच्या प्रकल्प अहवाल सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. पुढील वर्षी या धरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १०५ घनमीटर क्षमता असलेल्या या धरणातील पाणी जलवाहिनीद्वारे नैना क्षेत्र व विमानतळ प्रकल्पाला पुरविले जाणार आहे.

पेण तालुक्यातील हेटवणे धरणातील पाण्याचा तुटवडा दक्षिण नवी मुंबईला भासू लागल्यानंतर सिडकोने बाणगंगा धरणासाठी कोकण विकास जलसिंचन महामंडळाला अर्थपुरवठा केला. मात्र दहा वर्षांपूर्वी घडलेल्या जलसिंचन घोटाळ्यात या धरणाचे काम वादग्रस्त ठरल्याने या धरणापासून पाणीपुरवठा होण्याची आशा मावळली. त्यामुळे सिडकोने नवी मुंबईपासून ३४ किलोमीटर अंतरावर असलेले कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरण नैना क्षेत्रासाठी मिळावे यासाठी प्रयत्न केले. नऊ वर्षांपूर्वी बांधण्यास सुरुवात झालेल्या या धरणाचे ५६ कोटी खर्चाचे काम थेट ६१४ कोटींपर्यंत वाढविण्यात आले. त्यामुळे हे धरण देखील सिंचन घोटाळ्यात गंटांगळ्या खात होते. लाचलुचपत विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन सिडकोने हे धरण घेण्यासाठी कोकण विकास महामंडळाकडून हे धरण हस्तांतरित करून घेतले आहे. जुलै २०१७ रोजी राज्य शासनाने हे धरण सिडकोकडे हस्तांतरित केल्याने या धरण उभारण्याची सर्वस्वी जबाबदारी सिडकोची आहे. त्यानुसार सिडकोने तीन टप्प्यांत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे काम दिल्लीतील एका संस्थेला दिले आहे. या धरण क्षेत्रातील ११८ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असून वन विभागाची अडीचशे हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी लागणार आहे. या संर्दभात लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्याचे काम  सुरू असून पहिल्या टप्प्यातील प्रकल्प अहवालाच्या सव्‍‌र्हेक्षणाला सुरुवात झाली आहे. पुढील वर्षी या प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याचे सिडकोतील एका उच्च अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

भविष्याचे नियोजन

या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. सिडकोच्या दक्षिण नवी मुबंईत मोठय़ा प्रमाणात लोकसंख्या वाढणार असून विमानतळ, नैना, कॉपरेरेट पार्क, महा गृहनिर्मिती असे अनेक प्रकल्प उभे राहात असल्याने या संपूर्ण भागासाठी एक हजार दशलक्ष लिटर पाण्याची व्यवस्था सिडकोला आत्तापासून करावी लागणार आहे.