सर्वपक्षीय नेत्यांची जासईमध्ये बैठक, संघर्षाची चिन्हे

उरण : नवी मुंबई विमानतळाला सिडकोच्या संचालक मंडळाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पारित केल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र संताप आहे. सोमवारी जासई या ‘दिबां’च्या गावी नवी मुंबईतील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. यात विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यासाठी सर्व मार्गाने प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मागील अनेक वर्षांपासून विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची स्थानिक भूमिपूत्र, प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. यापूर्वीही अनेकदा त्यांनी सिडकोकडे ही मागणी केली आहे. गेल्या वर्षी विमानतळाला बळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा विषय समोर आल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी, बाळासाहेब यांच्या नावाला आमचा विरोध नाही. राज्यात अनेक मोठे प्रकल्प आहेत, त्यांना त्यांचे नाव देता येईल. मात्र दि.बा.पाटील हे प्रकल्पग्रस्तांचे नेते असून त्यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतरही सिडकोच्या संचालक मंडळाने  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पारित केला असून तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.  या परिसरातील प्रकल्पग्रस्तांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी तसेच राजकीय पक्षांनी याचा निषेध केला आहे. नवी मुंबईच्या जडणघडणीत दि.बा.पाटील यांचाही वाटा असून या विमानतळाला त्यांचेच नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी होत आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन समाजमाध्यमांवर करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी सायंकाळी जासई येथे नवी मुंबई, पनवेल व उरणमधील प्रमुख राजकीय नेत्यांची बैठक झाली. या  बैठकीत शासनाच्या पातळीवर सर्व पक्षीय नेत्यांकडून गाठीभेटी घेऊन विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव देण्याची मागणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच याकरिता एक कमिटीही स्थापन करण्यात येणार आहे. बैठकीमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांनी आपले विचार मांडले.

यामध्ये दि.बा.पाटील यांचे नाव हा येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा मुद्दा असून त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करण्याची मते मांडण्यात आली. त्याचप्रमाणे वेळ पडल्यास संघर्षाचीही तयारी ठेवण्याची मांडणी करण्यात आली आहे. या वेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, महेंद्र घरत, भूषण पाटील, अतुल भगत यांच्यासह अनेक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी तसेच जासई ग्रामस्थ उपस्थित होते.

या बैठकीसाठी भाजप, शेकाप, काँग्रेस, शिवसेना, मनसे, माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष आदी पक्षांचे नेते उपस्थित होते. सर्वांनी एकमत करीत दि.बा.पाटील यांच्या नावासाठी आग्रही राहत सर्वातोपरी प्रयत्न करण्याच्या व प्रसंगी आंदोलन करण्याचाही निर्णय घेतला.