पोलीस, नागरिक समन्वय बैठकीत घोषणा

मराठा आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईत निर्माण झालेला वाद सणांच्या काळात पुन्हा उफाळू नये म्हणून परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांनी वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहात समन्वय बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी नागरिकही  उपस्थित होते. नवी मुंबईत सलोखा कायम राहावा म्हणून अभिनेते नाना पाटेकर आवाहन करण्यासाठी येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

नवी मुंबई शहरात मराठा आंदोलानंतर आगरी विरुद्ध मराठा अशी तेढ निर्माण झाली होती. सुमारे ५८ पोलीस अधिकारी-कर्मचारी, १८ नागरिक गंभीर जखमी झाले. २०० पेक्षा अधिक वाहनांची मोडतोड झाली.

राहुल तोडकर या तरुणाची हत्या झाली आणि त्या प्रकरणी चार जणांना अटक झाली. या पाश्र्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘शत्रुराष्ट्रे दंगलींचा गैरफायदा घेऊन हिंसाचार भडकवण्यासाठी समाजमाध्यमांचा गैरवापर करतात. लोकसंख्येच्या २ टक्के गुन्हेगार समाजात आहेत. ते अशा कृत्यांत ओढले जातात,’ हे सुधाकर पाठारे यांनी निदर्शनास आणले. पुण्यातील गुन्हेगारी जगतातील अनेक उदाहरणे त्यांनी दिली. गुन्हेगारीमुळे न्यायव्यवस्था, तुरुंग, पोलीस, वकील यांवर खर्चाचा बोजा पडत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी चर्चा केली असून ते नवी मुंबईत लवकरच मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. सध्या ते जोधपूर येथे चित्रीकरण करीत आहेत. लवकरच ते आपली वेळ कळवतील, असेही पाठारे यांनी सांगितले. उपस्थित नेत्यांनाही त्यांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले.

बैठकीला माजी आमदार व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, मराठा समाज समन्वयक अंकुश कदम, भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, शिवसेना जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, नगरसेवक किशोर पाटकर, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, काँग्रेस नेते रमाकांत म्हात्रे, दशरथ भगत,माजी मेत्री शशिकांत शिंदे आदि सर्व पक्षिय नेते उपस्थित होते.

तीन ठिकाणी दहीहंडी रद्द

नवी मुंबईतील वातावरण अजूनही धुमसत असून त्याला पुन्हा गालबोट लागून शांततेचा भंग होऊ  नये म्हणून भाजपनेते वैभव नाईक यांच्यामार्फत आयोजित केली जाणारी सर्वात मोठी दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. कोपरखैरणे येथील गंगाई मित्रमंडळ आणि ऐरोलीमधील तरुण मित्रमंडळ यांनीही आपले उत्सव रद्द केले आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली. तिन्ही आयोजकांचा सत्कार करण्यात आला.