News Flash

नवी मुंबईतील ३५० हॉटेल अनधिकृत!

नवी मुंबईत एकूण एक हजार १५ हॉटेल्स असून केवळ ६५० हॉटेल्सना अद्याप परवाने दिले आहेत.

नवी मुंबईतील ३५० हॉटेल अनधिकृत!
नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून त्याला हॉटेल्स अपवाद नाहीत.

कुल्र्यात गॅस सिलिंडर स्फोटात आठ ग्राहकांना जीव गमवावा लागल्यानंतर राज्य सरकारने मुंबईसह सर्व हॉटेलांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, नवी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांनी याकडे हेतुपुरस्पर काणाडोळा केला असून शहरातील छोटय़ा-मोठय़ा हॉटेल्समध्ये मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असल्याचे आढळून आले आहे. नवी मुंबईत एकूण एक हजार १५ हॉटेल्स असून केवळ ६५० हॉटेल्सना अद्याप परवाने दिले आहेत.
नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून त्याला हॉटेल्स अपवाद नाहीत. दिघा येथील ९९ इमारतींवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने कारवाई सुरू आहे. गावात ‘फिफ्टी फिफ्टी’च्या नावाखाली अनधिकृत बांधकामांचा धुमाकूळ आजही सुरू आहे. स्थानिक प्रशासन या अनधिकृत बांधकामांवर वेळीच कारवाई करीत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांनी मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे करून वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याचा प्रयत्न केला आहे. कुल्र्यातील हॉटेल दुर्घटनेत आठ जणांचे प्राण गेल्यानंतरही नवी मुंबई पालिका प्रशासन हॉटेल्स व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा साधा विचार करीत नाही. त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांनी पोटमाळे काढून नियमांचे उल्लघंन केले आहे, तर काही हॉटेल मालकांनी बेकायदा टेरेस काबीज केले आहे. ऐरोलीतील वैभव, साईनिधी, कोपरखैरणे येथील वैशिष्टय़ अशा काही हॉटेल्सनी टेरेसचा कब्जा केला आहे.
टेरेसवर छप्पर टाकून ग्राहकांची व्यवस्था केली जात असल्याने नवी मुंबईत ‘रात्रविहार’ अनुभवण्यास मिळत आहे. वाशी, घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली, सीबीडी, नेरुळ येथे अनेक हॉटेल मालकांनी सदनिका विकत घेऊन हॉटल सुरू केले असल्याने इमारतीतील रहिवाशांना त्याचा त्रास होत आहे. काही हॉटेलची स्वयंपाक घरे उघडय़ावर आहेत. श्रेणी दोन तीनमधील एकाही हॉटेलची बांधकामे मंजूर आराखडय़ानुसार नाहीत. त्यामुळे अनेक सदनिका एकत्र करून उभारण्यात आलेल्या या हॉटेलमध्ये मोठय़ा प्रमाणात फेरफार करण्यात आलेले आहेत.
मार्जिनल स्पेसचा वापर तर हॉटेल मालकांनी हक्काची जागा म्हणून केला असून त्या ठिकाणी अतिरिक्त हॉटेल सुरू करण्यात आली आहेत. या हॉटेलची दैनंदिन तपासणी पालिकेचा आरोग्य, नियोजन व अग्निशमन दलाने करणे अभिप्रेत आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. प्रभाग अधिकाऱ्यांना मिळणारा लक्ष्मीप्रसाद या हॉटेलच्या बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणारा आहे.
मोकळ्या जागेचा बेकायदा कब्जा करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर पालिका कारवाई करीत नसल्याने बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या हॉटेल व्यावसायिकांना काबीज केलेल्या जागा भाडय़ाने देण्याचा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे मांडला आहे. हा अजब प्रस्ताव अद्याप मंजूर केलेला नाही. हॉटेलमध्ये सर्व अधिकारी मोफत खाऊन पालिकेचे उत्पन्न बुडवत असतील तर त्यांना मुंबई पालिकेप्रमाणे उत्पन्नाच्या जाळ्यात आणणे योग्य होईल, असा युक्तिवाद म्हात्रे यांनी केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास हॉटेल व्यावसायिकांना बेकायदा बांधकामे करण्यास रान मोकळे होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2015 4:17 am

Web Title: navi mumbai 350 illegal hotel
Next Stories
1 खारफुटीच्या रक्षणासाठी वाहनांना खाडीवर प्रवेश बंदी
2 दोन महिन्यांपासून लाखो लिटर पाणी वाया
3 उरणमधील समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी एल्गार
Just Now!
X