नवी मुंबई : शनिवारपासून देशपातळीवर लसीकरणास प्रारंभ होत असून नवी मुंबईतही यासाठीची सर्व तयारी पालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. शहरातील चार केंद्रांवर हे लसीकरण करण्यात येणार असून पहिल्या दिवशी ४०० जणांना लस देण्यात येणार आहे.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे २१ हजार २५० लशींच्या कुप्या बुधवारी दाखल झाल्या असून वाशी गाव येथील नागरी आरोग्य केंद्रात ठेवण्यात आल्या आहेत. यासाठीची सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. शहरातील लसीकरण मोहिमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यालय स्तरावर अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून विभागनिहाय तीन अधिकारी नेमण्यात आले आहेत. आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पालिकेचे लसीकरणासाठी ५० केंद्रांचे नियोजन आहे, मात्र शनिवारी यातील चार प्रमुख केंद्रांवर लसीकरण होणार आहे. यात पालिकेची वाशी व ऐरोली ही दोन सार्वजनिक रुग्णालये, नेरूळ येथील डॉ. डी.वाय.पाटील व अपोलो या दोन खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. नियोजित पाचवे केंद्र हे रिलायन्स रुग्णालयात होते, मात्र तेथील लसीकरण शासकीय आदेशानुसार शनिवारी होणार नाही. या प्रत्येक केंद्रावर शंभर जणांचे लसीकरण होणार आहे.

पूर्वकल्पना

लसीकरणासाठी नोंदणी झालेल्या आरोग्यकर्मींना त्यांचे लसीकरण कोणत्या केंद्रावर, कोणत्या तारखेला, कोणत्या वेळेत होणार आहे, याचा संदेश मोबाइलवर प्राप्त होणार आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते लसीकरणाचा देशपातळीवर शुभारंभ होताच पालिका क्षेत्रातही लसीकरणाला प्रारंभ होईल. शनिवारी होणाऱ्या लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून पहिल्या दिवशी ४ केंद्रांवर लसीकरण होणार असून ४०० जणांचे लसीकरण होईल.

-अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका