कोल्हापूर आणि सातारा येथे वाहतूक केली जात असलेली ९२९ किलो चांदी नवी मुंबई पोलिसांनी वाशी पथकर नाक्यावर गुरुवारी रात्री जप्त केली. या चांदीची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सहा कोटी १७ लाख ७७ हजार रुपये इतकी आहे. एका वाहनातून चांदी आणि चांदीच्या वस्तुंची वाहतूक केली जात होती. या प्रकरणी वस्तू आणि सेवाकर विभागामार्फत तपास करीत आहे.

मुंबईतून चांदीची बेकायदा पद्धतीने वाहतूक केली जात असल्याची माहिती परिमंडळ-१चे उपायुक्त सुरेश मेंगडे यांना मिळाली होती. त्यानुसार वाशी पथकर नाक्यावर नाकाबंदी करण्यात आली होती.  या वेळी केलेल्या कारवाईत  चांदीच्या वस्तू ताब्यात घेण्यात आली.

‘एक्स्प्रेस कुरियर’ यांच्यामार्फत ही चांदी पुणे, कोल्हापूर येथील काही व्यापाऱ्यांना देण्यात येणार होती. जीएसटी भरण्यात आला नव्हता. कर चुकवेगिरी करून चांदीची वाहतूक सुरू होती. संशय येऊ नये म्हणून कुरियरच्या माध्यमातून हा प्रकार सुरू होता.