उद्यान देखभाल दुरुस्तीच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. ठेकेदारांनी अनेक ठिकाणची कामेच केली नाहीत, तर उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही देयके न तपासताच मंजूर केली आहेत. त्यामुळे पालिका आयुक्तांनी दोन ठेकेदारांसह उद्यान विभागातील उपायुक्तासह १४ अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. कामे न करताच देयके लाटल्याचे चौकशीत समोर आले आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात वंडर्स पार्क, रॉक गार्डन यासह २८० उद्याने आहेत. या उद्यानांची यापूर्वी प्रकल्पग्रस्त ठेकेदारांमार्फत विभागानुसार देखभाल केली जात होती. मात्र गेल्या वर्षी ही परंपरागत ठेकेदारी पद्धत रद्द करीत परिमंडळ १ व परिमंडळ २ अशी विभागणी करीत फक्त दोनच ठेकेदारांनी ही कामे देण्यात आली होती. १ मेपासून ही कामे देण्यात आली होती, मात्र करोनाच्या काळात उद्यानांची देखभाल दुरुस्तीकडे ठेकेदारांनी दुर्लक्ष केले. कामाची देयके मात्र घेतली, यावर लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता. आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे पालिका आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमली होती. ३६० ठिकाणांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून दोन कार्यकारी अभियंत्यांनी पालिका आयुक्तांना अहवाल सादर केला आहे.

अहवालत काही ठिकाणची कामे न करता त्याचे देयक ठेकेदारांना देण्यात आले आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून केलेल्या हिरवळीच्या कामेही देयकात दाखविण्यात आली आहेत. वाशी येथील रघुलीला मॉलजवळील भूखंडावर करण्यात आलेले सुशोभीकरणाचा देयकात समावेश आहे, पण हे ठिकाणच अस्तिवात नाही. एका भूखंडाबाबत तर अधिकची देयक आकारणी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ठेकेदारांकडून ही फसवणूक झाली असताना उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी सादर देयकांची छाननी करणे, न केलेल्या कामांबाबत दंड आकारणे गरजेचे होते. परंतु अधिकाऱ्यांनी कमी दंड आकारणे, काही ठिकाणी दंडच न आकारणे, केलेल्या कामाचे मोजमापच न करणे याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या दोन टेकेदारांसह उद्यान विभागातील १४ अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. तीन दिवसांत यावर उत्तर देण्याचे नमूद केले आहे. पालिका प्रशासनाने ठेकेदारांना ८८ पानांची तल उद्यान विभागातील उपायुक्तांसह १४ उद्यान अधिकाऱ्यांना ८० पानांची नोटीस बजावली आहे.

इरावती व शहा या दोन ठेकेदारांना पाच वर्षांसाठी ही कामे देण्यात आली होती. वर्षांकाठी ३५ कोटींचे असून पहिल्या वर्षांच्या कामाच्या दर्जावरून पुढील कामे देण्याबाबत पालिका प्रशासन निर्णय घेणार होते. मात्र पहिल्याच देयकांत हा गैरव्यवहार समोर आला आहे.

सुशोभीकरण न करता देयक लाटले

ठेकेदारांनी पालिकेला सादर केलेल्या देयकात वाशी येथील रघुलीला मॉलजवळ सुशोभीकरण केल्याचे देयक सादर केले व त्याची वसुली केली. मात्र चौकशी समितीच्या पाहणीत हे ठिकाणच सापडले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

देयकांपेक्षा दंड अधिक

उद्यान देखभाल दुरुस्तीच्या केलेल्या तीन महिन्यांच्या कामाचे ठेकेदारांनी ८ कोटी १० लाखांचे देयक सादर केले आहे. मात्र चौकशी समितीने केलेल्या पाहणीनंतर यात दोषी आढळल्याने पालिका प्रशासनाने या दोन ठेकेदारांना दंडात्मक रकमेपोटी ८ कोटी ४४ लाखांची नोटीस बजावली आहे.

उद्यानांच्या देखभाल ठेक्याबाबत चौकशी अधिकाऱ्यांनी ३६० ठिकाणांची पाहणी करून अहवाल दिला  होता. त्यानुसार चौकशी  करून १४ अधिकाऱ्यांना व दोन ठेकेदारांना नोटीस बजावली आहे. महापालिकेत कोणतेही नियमबाह्य़ काम खपवून घेतले जाणार नाही.

– अभिजीत बांगर, आयमुक्त, महापालिका