News Flash

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : पोलीस जिथे अडवतील, तिथंच ठिय्या आंदोलन; कृती समिती ठाम

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी दि.बा. पाटील कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सिडको भवनाला घालणार घेराव

Navi Mumbai airport naming controversy, Navi Mumbai airport naming, DB Patil, Local group gherao CIDCO office
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी दि.बा. पाटील कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सिडको भवनाला घालणार घेराव

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद दिवसेंदिवस तापत चालला आहे. विमानतळाला नाव देण्यासाठी वेगवेगळ्या नावांची मागणी करण्यात आली असून, विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचंच नावं दिलं जावं, यासाठी स्थानिक भूमिपूत्रांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. १० जून रोजी रायगड, नवी मुंबई, पालघर व ठाणे या चारही जिल्ह्यातील नागरिकांनी विमानतळाला दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी मानवी साखळी करून लक्ष वेधलं होतं. त्यानंतर आज सिडको भवनाला घेराव घालण्यात येणार असून, रस्ते बंद करण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर जिथे पोलीस अडवतील, तिथंच ठिय्या आंदोलन केलं जाईल, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे.

नवी मुंबईतील सिडको भवनाला आंदोलक आज (२४ जून) घेराव घालणार आहेत. विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्त नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीने जोर धरला असून, बेलापूर येथील सिडकोच्या मुख्यालयाला हजारोच्या संख्येने घेराव घालण्यासाठी प्रकल्पग्रस्त आणि इतर राजकीय पक्षांतील कार्यकर्ते सकाळपासून सिडको कार्यालयाकडे रवाना होत आहेत.

जाणून घ्या : दि. बा. पाटील कोण होते? नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी का केली जातेय?

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सिडको मुख्यालयाकडे येणाऱ्या चारही मार्गांची बुधवारपासून नाकाबंदी सुरू केली. त्यासाठी सात हजार पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. या भागात सर्व प्रकारच्या खासगी वाहतुकीला सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. हे आंदोलन सर्वपक्षीय असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, सिडको भवनाला घेराव घालण्यासाठी दि.बा. पाटील कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलक गर्दी सिडको कार्यालयाकडे जात आहेत. पोलिसांकडून रस्ते बंद करण्यात आले असले, तरी आंदोलकांना अडवलं जात नसल्याचं कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मात्र, पोलिसांंनी अडवलं, तिथंच ठिय्या आंदोलन केलं जाईल, अशी भूमिका समितीने मांडली आहे.

वाहतुकीसाठी कोणते रस्ते असणार खुले?

पोलिसांनी बेलापूरच्या सिडको मुख्यालयाकडे येणारे सीबीडी महालक्ष्मी चौक, बेलापूर किल्ला, पार्क हॉटेल, पालिकेचे जुने मुख्यालय या चार मार्गांनी येणारे सर्व रस्ते अत्यावश्यक वाहनांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केले आहेत.

मुंबईहून पुणे-गोव्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला ऐरोली, शिळफाटा मार्गे कळंबोलीला जावे लागणार असून त्यानंतर ही वाहने पुणे- गोव्याकडे जाऊ शकणार आहेत. तर पुण्याहून येणाऱ्या वाहनांना तळोजा येथील पुरुषार्थ पेट्रोलपंपापासून वळण घेऊन शिळफाटा मार्गे मुंबईत जावे लागणार आहे.

वाशी टोलनाक्यावरून येणारी सर्व वाहने ही शिळफाटा मार्गानेच ये-जा करू शकणार आहेत. पोलिसांनी शीव-पनवेल मार्गावरील वाहतूक उरण फाटा ते खारघरपर्यंत बंद केली आहे. जड वाहनांना तर सकाळी आठ ते रात्रौ आठपर्यंत या भागात प्रवेशबंदी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 9:37 am

Web Title: navi mumbai airport naming controversy navi mumbai airport naming db patil local group gherao cidco office bmh 90
Next Stories
1 लाभार्थीनी भरलेले विलंब शुल्क परत करणार
2 वाहतूक पोलीसही सज्ज
3 लस तुटवडय़ामुळे केंद्रांवर गोंधळ
Just Now!
X