२५ हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता

नवी मुंबई सिडकोच्या वतीने नवी मुंबई विमानतळाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून या प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या टप्प्यासाठी या प्रकल्पावर पाच हजार ५०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. विमानतळपूर्व कामांवर तीन हजार ४००कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे १६ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातील ८ हजार ९०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा प्रकल्प डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण होणार असून प्रकल्पाचा खर्च २५ हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई विमातनळाच्या कामाला सुरुवात झाली आहे. गाभा क्षेत्राच्या उभारणीचे काम जीव्हीके कंपनीला मिळाले आहे. गेल्या शनिवारी या कामासाठी लागणाऱ्या ११६० हेक्टर जमिनीपैकी ९०टक्के जमीन जीव्हीके कंपनीला हस्तांतरित करण्यात आली. उर्वरित जमीन पावसाळ्यानंतर हस्तांतरित केली जाणार आहे. दोन हजार प्रकल्पग्रस्त अद्याप स्थलांतरित होणे बाकी आहे. जीव्हीकेला जमीन ताब्यात मिळाल्याने येस बँकेने अर्थसाहाय्य करण्याची तयारी दाखविली आहे. पहिल्या टप्प्यात पाच हजार ५००कोटींचे हे काम असून प्रकल्प चार टप्प्यांत उभारला जाणार आहे. पहिला टप्पा २०१९ अखेपर्यंत सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे विमानतळपूर्व कामांना गती आली आहे.

विमानतळपूर्व कामांचा ३४०० कोटी रुपये खर्च प्रकल्पात गृहीत धरल्यास पहिल्या टप्यातील खर्च जवळपास दहा हजार कोटींच्या घरात जात आहे. त्यानंतर शिल्लक तीन टप्प्यांतील खर्च हा हजार कोटींत होणे शक्य नाही. १६ हजार कोटी रुपयांच्या संभाव्य खर्चात तीन हजार ४०० कोटींची विमानतळपूर्व कामे गृहीत धरल्यास हा प्रकल्प वीस हजार कोटी रुपयांचा आकडा गाठत आहे. त्यावर कमीत कमी २५ हजार कोटी रुपये खर्च होईल असा अंदाज सिडकोच्या अभियंता विभागाने व्यक्त केला आहे. मात्र आता या प्रकल्पाचा खर्च फुगवून सांगितला जात नाही. सध्या जाहीर करण्यात आलेला १६ हजार कोटी रुपये खर्चाचा अंदाज हा २०१४ मध्ये काढण्यात आला होता.

विमानतळपूर्व कामे

आता डुंगी गावाचेही स्थलांतर करण्याची वेळ सिडकोवर येणार आहे. त्यांना पॅकेज दिल्यास सिडकोचा हा खर्चही वाढणार आहे. विमानतळपूर्व कामांतील उलवा टेकडीची उंची कमी करणे, सपाटीकरण, नदी प्रवाह बदल  यावर ३४०० कोटी रुपये खर्च होणार आहेत.