आमचं घर सुटलं, गाव उठलं, शेतीही गेली आणि पैसाही संपत आलाय..

सीमा भोईर, पनवेल</strong>

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील दहा गावांपैकी दोन गावांतील ३०० लोकांचे स्थलांतर शिल्लक राहिले असून हे स्थलांतर या महिनाअखेर होण्याची शक्यता आहे. मात्र वर्षभरापूर्वी स्थलांतरित प्रकल्पग्रस्तांची अवस्था भयानक आहे. सिडकोकडून घरांच्या मोबदल्यात भूखंड मिळाले असून त्यांना घराच्या क्षेत्रफळानुसार पैसे मिळाले आहेत, मात्र उत्पन्नाचे साधनच हिरावून घेतल्याने ते खर्चापोटी ते पैसेही संपत आले आहेत. त्यामुळे मोठे घर घेऊन भाडे परवडत नसल्याने या प्रकल्पग्रस्तांनी पूर्वी आपली जनावरे ज्या गोठय़ात(बेडीत) बांधली जात होती, तेथे आसरा घेतला असून काहींनी पत्र्याची शेड बांधून राहणे पसंत केले आहे.

आमचं घर सुटलं, गाव उठलं, शेतीही गेली आणि पैसाही संपत आलाय. सिडकोने दिलेल्या पैशात घर चालवायचे की भाडे भरायचे? असा पेच त्यांच्यासमोर आहे. विमानतळ होईल तेव्हा हाईल, पण आता किमान रोजगार तरी द्या! अशी मागणी ते करीत आहेत. जमीन गेली. सुबत्ता येईल, पैसे मिळतील असे वाटत होते, मात्र झालं भलतंच! अशी खंत विमानतळबाधित प्रकल्पग्रस्त काशीबाई धुमाळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी कोंबडभुजे, तरघर, वाघिवली, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, उलवे, कोल्ही, कोपर, चिंचपाडा, गणेशपुरी या दहा गावांपैकी सिडकोने आठ गावे प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून खाली केली आहेत. आता कोंबडभुजे आणि उलवा येथील सार्वजनिक प्रश्न प्रलंबित आहेत. सिडकोने २८८६ पैकी केवळ आता ३०० प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर करणे बाकी राहिले आहे.

घरांवर तुळशीपत्रे ठेवली

गेली अनेक वर्षे राहिलेले गाव सोडताना ग्रामस्थांना दु:ख अनावर होत आहे. गाव सोडण्याच्या कल्पनेने अनेक प्रकल्पग्रस्तांनी जगाचा निरोप घेतला आहे. देशाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ग्रामस्थांनी आपल्या घरांवर तुळशीपत्रे ठेवली आहेत. सिडकोने ग्रामस्थांना मोबदला दिला, पण त्याचे मोल गावाच्या बदल्यात चुकवावे लागत आहे. आता केवळ ३०० ग्रामस्थ राहिले आहेत, तेही गावाच्या काही समस्या मार्गी लावाव्यात म्हणून थांबले आहेत.

खायचे वांदे झालेत. तीन मुलं आहेत. मुलगा रिक्षा चालवतो, माझे वय झाले असतानाही मी गंवडीकाम करतो. सिडकोने दिलेले पैसे संपले आहेत. गरिबाला कोणी वाली नाही. शेती असताना कसेबसे पोट तरी भरत होतो. आता घर मोडलं, पैसा संपला आणि शेतीही गेली. आम्ही करायचं तरी काय?

– नंदकिशोर नाथा पाटील, प्रकल्पग्रस्त कोपर