सर्व मागण्या पूर्ण करण्याची मागणी

नवी मुंबई नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला अडथळा ठरू पाहणाऱ्या दहा गावांतील काही प्रकल्पग्रस्तांनी अद्याप गाव सोडलेले नाही. सिडकोने या प्रकल्पग्रस्तांना पंधरा डिसेंबपर्यंतची मुदत दिली आहे. गावातील सार्वजनिक अथवा वैयक्तिक सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय गाव सोडणार नाही असा पावित्रा या प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. जमीन ताब्यात घेईपर्यंत सर्व मागण्या कागदावर मान्य करणारी सिडको नंतर या मागण्या पूर्ण करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा प्रकल्पग्रस्तांचा अनुभव आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी हा पावित्रा घेतला आहे.

नवी मुंबई विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. सिडकोने आपल्या अखत्यारीतील उलवा टेकडीची उंची कमी करणे, सपाटीकरण, उलवा नदीचा प्रवाह बदलणे अशी विमानतळपूर्व कामे अंतिम टप्प्यात आणली आहेत. याच वेळी धावपट्टी व टर्मिनल्स उभारण्याचे काम सुरू केले गेले आहे. सोळा हजार कोटी रुपये हे काम जीव्हीके लेडच्या मुंबई इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला देण्यात आलेले आहे. त्यांना संपूर्ण गाभा क्षेत्रात काम करण्यासाठी दहा गावांचे स्थलांतर महत्त्वाचे आहे. या दहा गावांपैकी उलवा, कोंबडभुजे आणि तलघरमध्ये एकूण तीस टक्के घरे (एकूण घरे तीन हजार होती) अद्याप खाली करण्यात आलेली नाहीत. या प्रकल्पग्रस्तांनी ऑक्टोबर महिन्यात तिरडी मोर्चा काढून सिडकोचे लक्ष वेधले होते. त्यावेळी त्यांना वाढीव भाडे आणि बांधकाम खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या वैयक्तिक व सार्वजनिक काही मागण्या अद्याप प्रंलबित आहेत. त्यांची पूर्तता केल्याशिवाय ही घरे सोडणार नाही असा पावित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. सिडकोने काही मागण्या मंजूर केल्याने प्रकल्पग्रस्तांनी वीस ते पंचवीस घरे खाली केली आहेत, पण शेवटची मागणी पूर्ण होईपर्यंत प्रकल्पग्रस्त गावे खाली करणार नाहीत.

तीन गावांचे स्थलांतरही अधांतरीच

दहा गावांचे सिडकोने स्थलांतर केले आहे. त्यातील काही प्रकल्पग्रस्त आजही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. याव्यतिरिक्त स्थलांतरित करण्याची आवश्यकता नसलेली तीन गावे आता पावसाळ्यातील पूरजन्य परिस्थितीमुळे स्थलांतरित करावी लागणार आहेत. त्यांच्या मागण्याही प्रंलबित आहेत. ही सर्व गावे नात्यागोत्याने जोडली गेलेली आहेत. पूरजन्य स्थितीमुळे स्थलांतरित व्हावे लागणाऱ्या तीन गावांच्या मागण्यांसाठी त्या दहा गावांतील प्रकल्पग्रस्त देखील संघर्षांसाठी साथ देणार आहेत.

प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या सिडकोने मान्य केलेल्या आहेत. सिडको उर्वरित मागण्या पूर्ण करण्यासाठी आडमुठेपणा करणार असेल तर प्रकल्पग्रस्त संर्घष करण्यास तयार आहेत. प्रंलबित मागण्या मंजूर करून सिडकोने हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा.

पुंडलिक म्हात्रे, नवी मुंबई विमानतळ संघर्ष समिती