18 February 2019

News Flash

प्रकल्पग्रस्तांचा ‘बंदोबस्त’?

नवी मुंबई विमानतळासाठी एकूण दोन हजार २६८ हेक्टर जमीन आवश्यक आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

पंतप्रधान भेटीच्या पाश्र्वभूमीवर आंदोलने टाळण्यासाठी पोलिसांकडून दबाव

नवी मुंबई विमानतळ कामाच्या प्रारंभाच्या कार्यक्रमासाठी येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येत असल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. मंगळवारी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यांसर्दभात सोमवारी रात्री उशिरा पारगाव येथे प्रकल्पग्रस्तांनी एक बैठक घेतली. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांकडून हमी घेण्यास सुरुवात केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्यात नाराजी पसरली आहे.

नवी मुंबई विमानतळासाठी एकूण दोन हजार २६८ हेक्टर जमीन आवश्यक आहे. त्यात १० गावांच्या ६७१ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. ही गावे मार्चनंतर टप्प्याटप्प्याने स्थलांतरित होणार आहेत. जे प्रकल्पग्रस्त लवकर स्थलांतर करतील त्यांना सिडकोने प्रोत्साहनपर भत्ता जाहीर केला आहे. या प्रकल्पात पारगाव, डुंगी, ओवळा, दोपोली आणि भंगारपाडा ही गावे स्थलांतरित होणार नाहीत, पण त्यांना या प्रकल्पाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनीही स्थलांतराची मागणी केली आहे.

सध्या दोन हजार कोटी रुपये खर्चाची विमानतळपूर्व कामे सुरू आहेत. ही कामे चार मुख्य कंत्राटदरांना विभागून देण्यात आली आहेत. यातील वाहतूक, भराव टाकणे, बांधकाम सहित्य पुरवठा यासारखी छोटी मोठी ५० टक्के कामे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यासाठी ५० प्रकल्पग्रस्तांची एक सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. ही कामे अद्याप प्रकल्पग्रस्तांना देण्यात न आल्याने मोठय़ा प्रमाणात नाराजी पसरली आहे. ही कामे सर्व प्रकल्पग्रस्तांना विभागून देण्यात यावीत, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. आजूबाजूच्या तीन कोटी मेट्रिक टन भरावामुळे काही गावांना धोका निर्माण होणार आहे. त्यांच्यासाठी सिडकोने कोणती उपाययोजना केली आहे, याबाबत प्रकल्पग्रस्त अनभिज्ञ आहेत. त्यामुळे मंगळवारी पारगावातील भरावाची कामे बंद करण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. या संदर्भात सोमवारी रात्री पारगाव येथे प्रकल्पग्रस्तांची एक बैठक झाली.  नवी मुंबई विमानतळ हा केंद्र सरकारसाठी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच नवी मुंबईत येत आहेत. त्यांच्या या कार्यक्रमात कोणताही व्यत्यय येऊ नये, आंदोलन होऊ नये यासाठी नवी मुंबई पोलीस सर्तक आहेत. त्यातून आंदोलन करणाऱ्या नेत्यांचा अंदाज घेतला जात आहे. ही आंदोलने होऊ नयेत, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. रायगड जिल्ह्य़ात शेकाप सक्रिय असून त्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविले जाऊ शकतात किंवा आंदोलन होऊ शकते. त्यामुळे पोलिसांचा गुप्तहेर विभाग सक्रिय झाला आहे. पोलिसांच्या दबावामुळे प्रकल्पग्रस्त नाराज झाले असून, पारगावमध्ये मंगळवारी सकाळी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न पोलीस करतील, असा संशय प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला.

प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. सिडकोने केवळ आश्वासने दिली आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पदरात आता काही पडले नाही तर ते कधीच मिळणार नाही. त्यामुळे भूमिपूजन कार्यक्रमाआधी प्रकल्पग्रस्तांची अर्धी कामे आणि गाव नियोजन याबाबत भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे.

– महेंद्र पाटील, नवी मुंबई विमानतळ शेतकरी संर्घष समिती

First Published on February 13, 2018 2:51 am

Web Title: navi mumbai airport project victims to protests against narendra modi