सपाटीकरण पूर्ण होईपर्यंत २०१९ उजाडण्याची शक्यता

उलवा टेकडीची उंची आठ मीटपर्यंत कमी करण्यासाठी दररोज होणारे आठ ते नऊ सुरुंग स्फोट, दगड, मातीची वाहतूक करणारे शेकडो ट्रक, खोदकामासाठी अद्ययावत ड्रील यंत्रणा, त्याचा सातत्याने सुरू असलेला खडखडाट अशा वातावरणात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासपूर्व कामांपैकी १० टक्के कामे झाली आहेत. एक हजार १६१ हेक्टर जमिनीचे सपाटीकरण डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होईल, असा सिडकोचा दावा आहे, मात्र खोदकाम आणि वाहतुकीचे प्रमाण पाहता हे सपाटीकरण केवळ १४ महिन्यांत होण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे या धावपट्टीवरून डिसेंबर २०१९मध्ये उड्डाण सुरू होणे अपेक्षित असले, तरीही हे उड्डाण लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

गेली २० वर्षे चर्चेत असलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या कामाला पावसाळ्यात सुरुवात झाली. या कामाची सद्य:स्थिती प्रसारमाध्यमांना गुरुवारी दाखविण्यात आली. झारखंड मधील केंद्रीय खनन आणि इंधन अनुसंधान संस्थेच्या (सीएसआयआर) मार्गदर्शनाखाली उलवा व पारगाव क्षेत्रांत स्फोट करून जमीन सपाट करण्यात आली आहे. उलवा येथील ९१ मीटर उंच टेकडीची उंची कमी करण्यासाठी स्फोट करण्यात येत आहेत. दुपारी एक ते दोन आणि संध्याकाळी पाच ते सहा या दोन वेळेत रोज आठ ते नऊ स्फोट केले जात आहेत. आतापर्यंत ३०० स्फोट झाले आहेत. डोंगरावर खड्डे तयार करून त्यात स्फोटके भरली जातात. त्यानंतर सायरन वाजवून सर्व कर्मचाऱ्यांना दूर केल्यानंतर स्फोट केले जातात, अशी माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी २१ खड्डय़ांत स्फोटके भरून स्फोट घडवण्यात आला. यापूर्वी २००-३०० खड्डय़ांत स्फोटके भरून स्फोट घडविले आहेत. स्फोट झाल्यानंतर डोंगरावरील दगड-माती खाली घरंगळत येते. त्यामुळे दगड दूरवर उडत नाहीत. उलवा टेकडीची उंची कमी करण्याच्या शेवटच्या टप्प्यात २०-२५ मीटर खोल खड्डे खोदावे लागणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्फोटातील माती, मुरुम आणि दगड वाहून नेण्यासाठी शेकडो ट्रक रात्रंदिवस काम करीत आहेत. विमानतळासाठी एकूण दोन हजार २६८ हेक्टर जमीन आवश्यक आहे. त्यातील एक हजार १६१ हेक्टर जमीन सपाट केली जाणार आहे. हे काम पुढील १४ महिन्यांत होणार असल्याचा विश्वास सिडकोच्या वतीने व्यक्त केला जात आहे. ड्रिल करण्याच्या यंत्रणेला दिवसाला ६०० खड्डे खोदण्याचे काम देण्यात आले आहे, मात्र दिवसाला केवळ ३०० खड्डे खोदले जात असल्यामुळे डिसेंबर २०१८ पर्यंत सपाटीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य गाठणे अशक्य असल्याचेच मत येथील अधिकाऱ्यांनी खासगीत व्यक्त केले.

या एक हजार १६१ हेक्टर जमिनीच्या सपाटीकरणासाठी चार कंत्राटदार काम करत आहेत. त्यात जेएमएम, टीआयपीएल या स्थानिक कंत्राटदाराला सार्वधिक ५५४ हेक्टर जमीन सपाट करण्याचे काम दिले आहे. त्यांना या कामाचे ५२९ कोटी रुपये मिळणार आहेत. यात हे दोन कंत्राटदार उलवे नदीचा प्रवाहदेखील बदलणार आहेत. राजकारणात प्रतिस्पर्धी असलेल्या दोन नेत्यांनी एकत्र येऊन हे काम घेतले आहे. त्यानंतर ३५५ हेक्टरच्या सपाटीकरणाचे काम ‘गायत्री प्रोजेक्टस्’ करणार आहे. त्यांना यासाठी ६९९ कोटी रुपये मिळणार आहेत. तिसरे काम सॅनजोसे जीव्हीके (मुंबई विमानतळाचे नूतनीकरण करणारी कंपनी) करणार आहे. त्यांना ३०७ हेक्टर सपाटीकरणाचे काम देण्यात आले असून, त्यासाठी सर्वाधिक म्हणजे ८०४ कोटी रुपये मोबदला दिला जाणार आहे. मुख्य धावपट्टीचे काम सुरू करण्यापूर्वी दोन हजार ३३ कोटी २१ लाख रुपयांची कामे होणार आहेत.

प्रकल्पग्रस्तांना सर्व सुविधा

  • विमानतळसाठी चिंचपाडा, कोपर, कोल्ही, उलवे, वरचा ओवळे, वाघिवली, वाघिवली वाडा, गणेशपुरी, तरघर, कोंबडभुजे या १० गावांचे स्थलांतर केले जाणार आहे. या गावातील प्रकल्पग्रस्तांची ६७१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यांचे पुनर्वसन फेब्रुवारी १८पर्यंत वडघर, वहाळ, दापोली या गावांनजीक होणार असल्याचे सिडकोने जाहीर केले आहे. या नवीन ठिकाणी सिडको शाळा, समाज मंदिर, ग्राम प्रशासन संकुल, बाजारपेठ, वाहनतळ, धार्मिक केंद्र, महिला मंडळ, नागरी आरोग्य केंद्र, आणि स्मशानभूमी अशा सर्व सुविधा पुरवणार आहेत.
  • वडघर येथील राज्य महामार्गाला लागून असलेल्या ४० हेक्टर जमिनीवर चिंचपाडा, कोल्ही, कोपर, वाघिवली, वाडा या गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे. २१ हेक्टर जमिनीवर चिंचपाडय़ातील तीन भागांचे पुनर्वसन आहे. याच ठिकाणी १५ हेक्टर जमिनीवर एकटे वरचा ओवळा गाव वसविला जाणार आहे. वहाळ गावानजीक ७३ हेक्टर जमिनीवर उलवे, तरघर, कोंबडभुजे आणि गणेशपुरी गावांची पुनर्वसन केले जाणार आहे.