नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून रविवारी एकाच दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक ८२ करोनाबाधित आढळून आले. त्यामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या ६७४वर पोहोचली. तर दोन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. यामुळे मृतांची एकूण संख्या १४ वर पोहोचली. मृतांमध्ये कोपरखैरणे येथे राहणारा व कृषी उत्पन्न बाजारपेठेतील व्यापाऱ्याकडून विविध ठिकाणी टेंम्पोने कांदा बटाटा पोहचवणाऱ्या व्यक्तीचा समावेश असून दुसरा मृत्यू सीवूड्स येथील डॉक्टर पत्नीचा झाला आहे.

आज शहरातील तुर्भे -२०, बेलापूर- ३, नेरुळ – ७, वाशी – २१, कोपरखैरणे – १४, घणसोली – ५, ऐरोली – ८, दिघा येथे ४ अशा ८२ रुग्णांची वाढ झाली आहे. शहरातील सर्वात मोठा करोनाचा हॉटस्पॉट कृषी उत्पन्न बाजार समिती ठरली. आज कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित दुसरा मृत्यू झाला. तो कांदा बटाटा विक्रेता व्यापाऱ्याशी संबंधित आहे.

शहरात काही दिवस रुग्ण वाढण्याची शक्यता – महापालिका आयुक्त

नवी मुंबई शहरातील करोना संशयितांना पनवेल येथील इंडिया बुलमध्ये क्वारंन्टाइन करण्यात आलं आहे. तेथील संशयितांनी सुविधांअभावी प्रशासनाविरोधात राग व्यक्त केला होता. त्याबाबत भेट घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला असून शरहरात रविवारी एका दिवसांत सर्वोच्च ८२ रुग्ण सापडले. अजून काही दिवस रुग्ण वाढत जातील परंतू, त्यानंतर मात्र ही संख्या कमी होईल. प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असून रुग्ण वाढलेल्या एपीएमसीचे पूर्ण निर्जंतुकीकरणाचे काम सोमवारपासून करण्यात येणार आहे, असे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.