नवी मुंबई पालिकेची माहिती; वाहतूक आराखडा तयार

विकास महाडिक

शहरातील वाहतूक सुखकारक होऊन त्यात अधिक गतिमानता (मोबिलिटी) यावी यासाठी पालिकोने संपूर्ण शहराचा एक वाहतूक आराखडा तयार केला असून यातील ठाणे-बेलापूर, पामबीच, पामबीच विस्तार, वाशी ते कोपरखैरणे व एमआयडीसीत उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी केंद्र सरकारचे अर्थसाहाय्य घेणार आहे. यात कांजूरमार्ग ते घणसोली या खाडीपुलाचाही समावेश असणार आहे. या सर्व पुलांसाठी पालिकेला प्राथमिक अंदाजानुसार एक हजार ५०० कोटी रुपये लागणार आहेत.

नवी मुंबईत अलीकडे वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणात वाढू लागली आहे. ठाणे-बेलापूर मार्ग व शीव-पनवेल महामार्गावरून ये-जा करणाऱ्या लाखो वाहनांची या वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. शीव-पनवेल महामार्गावरील अंर्तगत वाहतुकीला पर्याय म्हणून तुर्भे ते खारघरदरम्यान रस्ते विकास महामंडळाकडून पारसिक डोंगरातून बोगदा तयार करून पर्याय काढला जाणार आहे. घणसोली ते ऐरोली या गेली बारा वर्षे रखडलेल्या पामबीच विस्तार मार्गालाही सिडकोने अर्थसाहाय्य करण्याची तयारी दर्शवल्याने पालिकेने या मार्गासाठी सल्लागार नेमला आहे. नवी मुंबईतील पार्किंग समस्येने उग्र रूप धारण केले आहे. पालिका त्यावर उपाययोजना करीत आहे. बेलापूर येथे बहुमजली इमारत उभारत आहे. भविष्यात नवी मुंबईत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर विविध उपाययोजना केल्या जात असून पालिकेने एक मोबिलिटी आराखडा तयार केला आहे.

केंद्रात भाजप सरकार असून नवी मुंबईतही विधानसभा निवडणुकी अगोदर राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपची सत्ता अस्तित्वात आली आहे. सात वर्षे खासदार राहिलेले शहराचे माजी महापौर डॉ. संजीव नाईक यांनी केंद्र सरकारचा जास्तीत जास्त निधी शहराच्या विकासासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यात शहरातील सर्व उड्डाणपुलांसाठी केंद्र सरकारचे अर्थ साहाय्य मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे. पामबीच मार्गावर आता मोठय़ा प्रमाणात वाहनांची संख्या वाढली असून एनआरआय, नेरुळ सेक्टर ४८, नेरुळ सेक्टर ६, करावे, मोराज सर्कल आणि महात्मा फुले सभागृहाजवळ सध्या सिग्नल यंत्रणा असून या ठिकाणी सहा उड्डाण पुलांची आवश्यकता भासू लागली आहे.

अरेंजा कॉर्नर व पुढे महापे येथील उड्डाणपुलांची निविदा प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. याशिवाय कोपरखैरणे येथील डायमंड कॉर्नर, तीन टाकी आणि पुढे घणसोली व ऐरोली यांना जोडणारा पामबीच मार्ग या ठिकाणीही उड्डाणपूल बांधावे लागणार आहेत. ऐरोली येथील सेक्टर पाच ते दिवा सर्कलपर्यंत उड्डाणपुलांची चाचपणी केलेली आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरही दिघा, भारत बिजली, रबाले

एमआयडीसी या ठिकाणी सध्या मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. एमआयडीसीत खैरणे, पावणे येथे उड्डाणपुलांची भविष्यात गरज भासणार आहे. या सर्व उड्डाणपुलांचा बांधणी खर्च एक ते दीड हजार कोटी रुपयापर्यंत जाणार आहे.

नवी मुंबई पालिकेची आर्थिक स्थिती चांगली असली, तरी केवळ एका नागरी व्यवस्थेसाठी इतक्या मोठय़ा निधीची तरतूद करणे शक्य नाही. त्यामुळे यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते प्राधिकरणांची आर्थिक मदत घेण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. राज्य

सरकारची आर्थिक स्थिती ठीक नसल्याने शासनाकडून मदत मिळण्याची पालिकेला अपेक्षा कमी आहे. त्यामुळे पालिका स्मार्ट शहरांसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करीत आहे.

उड्डाणपूल मिशन

केंद्र सरकारने यापूर्वी २० वर्षांपूर्वी ठाणे बेलापूर मार्ग उभारण्यासाठी पालिकेला ‘असाईड’च्या वतीने अर्थसाहाय्य केले होते. मलनिस्सारणाच्या काही योजना जेएनएनआरयूएमच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आल्या असून सध्या अमृत योजने अंतर्गत नाला सुशोभीकरण केले जात आहे. याच पाश्र्वभूमीवर शहरातील वाहतूक मोबिलिटी करण्यासाठी उड्डाणपूल मिशन ठरविण्यात आले आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला असून वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी केंद्र सरकारची आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

-सुरेंद्र पाटील, शहर अभियंता पालिका