नवी मुंबईच्या सानपाडा परिसरातील ‘स्वराज बिल्डर्स आणि डेव्हलपर्स’चे मालक राज कंदारी यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कंदारी यांनी काल स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर वाशी येथील महात्मा गांधी मिशन रूग्णालयात उपचार सुरू होते. राज कंदारी यांचे चेंबूर, ऐरोली, कोपरखैराणे, सानपाडा, उलवे, नवीन पनवेल येथे मोठे बांधकाम प्रकल्प आहेत.
राज कंदारी हे गेल्या काही दिवसापासून आर्थिक संकटात होते. नवीन पनवेल आणि उलवा इथे हाती घेतलेल्या प्रोजेक्टमध्ये त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. कंदारी यांच्या पनवेलजवळच्या वाकडी प्रोजेक्टला काही परवानग्या मिळत नव्हत्या. तर उलवा येथील गृहबांधणी प्रकल्पाला काही राजकीय कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जात असल्याचे समजते. राज कंदारी यांच्याशेजारी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. मात्र यात त्यांनी कोणाच्याही नावाचा स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. त्यामुळे हे प्रकरणही ठाण्यातील सुरेश परमार आत्महत्याप्रकरणाची पुनरावृत्ती असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.