पती-पत्नीच्या नात्यामध्ये विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. एकदा का, विश्वासाला तडा गेली की नात्याची इमारत लगेच कोसळते. अशीच एक घटना नवी मुंबईत कोपर खैराणेमध्ये समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका बिल्डरच्या फ्लॅटमध्ये घरफोडी झाली. तब्बल चार लाख रुपयांचा मुद्देमाल गायब होता. नवी मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना बिल्डरची पत्नीचं मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.

पत्नीच मुख्य गुन्हेगार असल्याचे समजल्यानंतर बिल्डरने आपल्याला हा विषय पुढे वाढवायचा नाहीय, असे पोलिसांना सांगितले. या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

नेमकं काय घडलं?

१७ जूनला बिल्डरने घरडफोडी झाल्याची तक्रार नोंदवली. १५ जून रोजी पत्नीची तब्येत बिघडल्याने बिल्डर तिला घनसोली येथील रुग्णालयात घेऊन गेला. त्याचदिवशी रात्री आठच्या सुमारास त्याने पत्नीला रुग्णालयाजवळ राहणाऱ्या तिच्या काकांच्या घरी सोडले. कारण तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचे होते.

१७ जून रोजी बिल्डर पत्नीच्या काकांच्या घरी पोहोचला व दुपारी २.३० वाजता तिला रुग्णालयात घेऊन गेला. त्याचदिवशी रात्री ७.३० वाजता तो पत्नीला पुन्हा आपल्या घरी घेऊन आला. पत्नीने दरवाजा उघडला तर समोर संपूर्ण घर अस्ताव्यस्त झालेले दिसले. घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झालेली होती. खिडक्यांचे दरवाजे तुटलेले होते.

तिने का केली चोरी?
बिल्डरने लगेच पोलीस स्थानकात धाव घेतली व घरातून १ लाखाच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, शेजाऱ्यांशी बोलले पण त्यातून काहीही लीड मिळाला नाही. बिल्डरच्या पत्नीच्या जबानीमध्ये थोडी विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी करताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. पती घरामध्ये नसताना मी घरी आले होते. त्यावेळी पैसे आणि रोख रक्कमेची चोरी केल्याचे तिने सांगितले. बिल्डरच्या पत्नीच्या डोक्यावर कर्ज झाले होते. ते फेडण्यासाठी तिने आपल्याच घरात चार लाखांची चोरी केली.