आठवा रुग्ण सापडला; आणखी एका महिलेचा मृत्यू, ४५३ जणांचे घरीच अलगीकरण

 

नवी मुंबई : मुंबई एमएमआरडीए हद्दीत करोना संसर्ग झालेले रुग्ण वाढत असून नवी मुंबई शहरातील रुग्णांची संख्या आठवर पोहचली आहे. त्याता गोवंडीतील एका करोनाबाधीत महिलेचा नवी मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयात गुरुवारी मृत्यू झाला. त्यामुळे नवी मुंबई शहराची चिंता वाढली आहे. त्यात घरीच अलगीकरण करून घेतलेल्यांची संख्याही ४५३ पर्यंत पोहचली आहे.

दरम्यान, पालिका प्रशासन शहरात गर्दीच्या ठिकाणी र्निजतुकीकरण करीत असून नागरिकांना पालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे व घरातच थांबवण्याचे आवाहन करीत आहे.

वाशी येथील नूर मंजील येथे आलेल्या ११ फिलीपाईन्स नागरिकांमधील दोघांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातील ६८ वर्षीय वृद्धाचा कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू होता. वाशी येथील नूर मंजील येथील मौलानाला करोनाचा प्रादुर्भाव झाल्याने त्याच्या सहवासात आलेल्या त्याच्या मुलाला व घरकाम करणाऱ्या महिलेलासुध्दा करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या मौलवीच्या नातवाची व पत्नीची करोनाची तपासणी निगेटिव्ह आली आहे. या मौलवीच्या सहवासात आलेल्या जवळजवळ ५६ जणांना पालिकेने शोधून काढले असून त्यांचेही घरीच विलगीकरण केले आहे. वाशी येथील विलगीकरण केंद्रात ९६ जणांना ठेवण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे यांनी दिली.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवरमहापालिका प्रशासनाने शहरातील नागरिकांचे आरोग्याबाबतचे सर्वेक्षण सुरू केले आहे. घरोघरी जाऊन नागरिकांना माहिती विचारली जात आहे. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे व माहिती न लपवण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी आहे.

‘डी. वाय’ रुग्णालयाला नोटीस

करोनाने मृत झालेली महिला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल होती. तेथून ती नेरुळ येथील डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात दाखल होती. अत्यवस्थ झाल्यानंतर वाशीतील रुग्णालयात हलविण्यात आले होते. ती पालिकेच्या रुग्णालयात फक्त चार तास होती. पाटील रुग्णालयाने याबाबत हलगर्जी केली असून त्यांना नोटीस पाठवली जाणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले. रुग्णालयाचे सीईओ डॉ. राहुल  पेड्डावाड यांच्याशी संपर्क झाला नाही.

घाबरू नका

शहरात करोनाचे आठ रुग्ण असून त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र यातील शहरातील स्थानिक कोणी नाही. एक मृत फिलीपाईन्सचा तर दुसरी मृत महिला गोवंडीची राहणारी होती. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.

पालिकेचे अ‍ॅप

नवी मुंबई महापालिकेच्यावतीने एक मोबाईल अ‍ॅप बनवण्यात येत असून त्यातील आरोग्याबाबतचा अर्ज नागरिकांमार्फत भरुन द्यावयाचा आहे. या अ‍ॅपवर आरोग्याबाबतची सर्व माहिती मिळणार आहे. यासाठी प्रत्यक्ष घरोघरी जाऊनही माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

शहरातील स्थिती

  • ०८ करोना संसर्ग रुग्ण
  • ०२ करोनामुळे मृत्यू
  • ४५३ घरी अलगीकरण
  • ९६ विलगीकरण कक्षातील संख्या