News Flash

तीन वर्षांत शहर विकास आराखडा

पालिका स्थापनेनंतर पहिल्या २० वर्षांत त्या शहराचा विकास आराखडा जाहीर होणे आवश्यक होते

सध्या सिडकोच्या विकास आराखडय़ानुसारच शहरातील कामे होत आहेत.

नवी मुंबईचा विकास आराखडा बनविण्यासाठी पालिकेची जय्यत तयारी

नवी मुंबई पालिकेच्या नगररचना विभागानेच शहराचा विकास आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्याने विकास आराखडय़ाच्या कामाला जोरदार सुरुवात झालेली आहे. यासाठी पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी स्वत: आग्रही असल्याने या कामाला लागणारा अतिरिक्त अधिकारी, अभियंता वर्ग त्यांनी यापूर्वीच नगररचना विभागाला दिला आहे. त्यामुळे येत्या तीन वर्षांत शहराचा स्वयंपूर्ण विकास आराखडा तयार होणार आहे. यात एमआयडीसी, सिडको आणि अडवली-भुतवली गावातील जमिनीचा समावेश करण्यात आला आहे.

नवी मुंबई पालिका स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पालिका स्थापनेनंतर पहिल्या २० वर्षांत त्या शहराचा विकास आराखडा जाहीर होणे आवश्यक होते; मात्र नवी मुंबई पालिकेने हा २००७ मध्ये केलेला प्रयत्नदेखील फोल ठरला. त्यामुळे सिडकोच्या विकास आराखडय़ावर पालिका कारभार हाकत होती. गेल्या वर्षी हा विकास आराखडा तयार करण्यासाठी बाह्य़ संस्थेला काम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबई पालिकेने असा विकास आराखडा नुकताच खासगी संस्थेच्या वतीने तयार केला होता. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली होती; मात्र नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत हा विकास आराखडा पालिकेचाच नगररचना विभाग करेल असा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने मांडण्यात आला होता. त्याला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. या कामासाठी लागणारा कर्मचारी व अधिकारी वर्ग पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी नगररचना विभागाला दिलेला आहे.

अडवली-भुतवलीचा समावेश

या आराखडय़ात सिडकोचे सात उपनगरी विभाग जे पालिकेला हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे एमआयडीसीचा २२ किलोमीटरचा भाग समाविष्ट करण्यात आलेला आहे. याच एमआयडीसीच्या शेजारी असलेल्या पूर्वीच्या एमएमआरडीएच्या अडवली-भुतवली गावातील चार किलोमीटरच्या भूभागाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे पालिका सुमारे १०९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा विकास आराखडा तयार करणार आहे. यात निवासी ४७५२ चौरस किलोमीटर, औद्योगिक २२७९ चौरस किलोमीटर, वनविभाग २४१४ किलोमीटर आणि १५१४ चौरस किलोमीटरचा भाग आहे. सिडकोने अद्याप या क्षेत्रातील तीन हजार मोकळे भूखंड पालिकेकडे हस्तांतरित केलेले नाही. पालिकेचा नगररचना विभाग सध्या वापरयोग्य जमिनीचा विकास आराखडा तयार करणार असून आरक्षण टाकताना हरकती मागविल्या जाणार आहेत. या सर्व प्रक्रियेला आणखी दोन ते तीन वर्षे लागणार आहेत.

शहराचा विकास आराखडा तयार करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळालेली आहे; पण त्यासंदर्भातील इतिवृत्तांत अद्याप या विभागाला प्राप्त झालेला नाही. विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला पालिकेने सुरुवात केली आहे. एमआरटीपी कायद्यानुसार यातील प्रत्येक पायरीवर मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे हा आराखडा तयार होण्यास आणखी दोन ते तीन वर्षे लागणार आहेत.

सतीश उगीले, नगररचनाकार, नवी मुंबई महापालिका 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 1:54 am

Web Title: navi mumbai city development plan in three year navi mumbai municipal corporation
Next Stories
1 नियमांची पूर्तता केल्यानंतरच घनकचरा प्रकल्पाचे हस्तांतर
2 पनवेल पालिका क्षेत्रात दारूबंदीची सूचना
3 छप्पर जिवावर उठले!
Just Now!
X