दहा वर्षांत पहिल्यांदाच पाणी तुंबले

नवी मुंबई शहरातील पूर्व बाजूस असलेल्या तीनशेपेक्षा जास्त दगडखाणी, गेल्या दहा वर्षांत एक लाखापर्यंत उभी राहिलेली बेकायदेशीर बांधकामे आणि नालेसफाईतील कमीपणा यामुळे नवी मुंबईत गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणात पाणी भरल्याने मुंबईप्रमाणे नवी मुंबईही सोमवारच्या पावसात तुंबली.

नवी मुंबईची भौगोलिक रचना पारसिक डोंगराची रांग आणि खाडी यांच्यामधील भूभागावर झालेली आहे. त्यामुळे डोंगर भागातून वाहणारे मोठय़ा प्रमाणातील पाणी खाडीकडे झेपावते. त्यामुळे सिडकोने आणि नंतर पालिकेने १८ ठिकाणी पावसाळी पाणी वाहून नेणारे नाले बांधलेले आहेत. या नाल्यांची वार्षिक सफाई केली जाते. याच नाल्यांमध्ये खाडीतील भरतीचे पाणी शहराच्या मधोमध भागापर्यंतदेखील येते. उघाडी पद्धतीने बांधलेली धारण तलावात पाणी साठवण्याची काही क्षमता आहे. या व्यतिरिक्त आलेले भरतीचे पाणी या पावसाळी नाल्यांत घुसत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे या पावसाळी नाल्यांची सफाई चांगल्या प्रकारे होण्याची आवश्यकता आहे. ती यंदा चांगली झाली नसल्याची चर्चा आहे.

याशिवाय पारसिक डोंगराच्या रांगेत असलेल्या तीनशेपेक्षा जास्त दगडखाणी पाणी भरण्यास कारणीभूत ठरत असल्याचे यापूर्वीदेखील स्पष्ट झाले आहे. यातील अनेक दगडखाणी सध्या बंद आहेत, पण सुरू असलेल्या दगडखाणीतील कामगारांसाठी बांधण्यात येणाऱ्या झोपडय़ा या पावसाळी नाल्यावर भराव टाकून उभारल्या जात असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय शहरात राडारोडा टाकणारे भू-माफिया हे पावसाळी नाले बुजवून टाकण्यात माहीर झाले आहेत. शहरात कुठेही राडारोडा टाकण्यास मंजुरी देणाऱ्या टोळ्या शहरात आहेत. त्यामुळे दगडखाणीच्या पायथ्याशी असलेल्या पावसाळी नाल्यांची भरावामुळे दिशा बदलून गेली आहे.

तुर्भे येथे पाणी साचण्याची कारणे शोधताना पालिका आयुक्तांना ही बाब लक्षात आल्याने त्यांनी दगडखाणीच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या दोन प्रमुख कारणांबरोबरच शहरातील झोपडय़ा व ग्रामीण भागात उभे राहिलेले अस्तव्यस्त बेकायदा बांधकामे हे या ‘तुंबई’ला अधिक कारणीभूत असल्याचे शहर नियोजनातील अधिकारी व अभियंत्यांचे मत आहे. नवी मुंबईतील गावात इंच इंच जागेवर बेकायेदशीर बांधकामे झाल्याने पाय ठेवायला जागा नाही. त्यामुळे गावातील पावसाचे पाणीही जवळच्या शहरी भागात पसरत असल्याचे दिसून येते. एमआयडीसी भागात ८० हजारांपेक्षा जास्त उभ्या राहिलेल्या झोपडय़ा या सरकारी जमिनीवर भराव टाकून बांधण्यात आलेल्या आहेत. स्थानिक भू-माफियांनी त्या चाळीस ते पन्नास हजार रुपये एक झोपडीची जागा या हिशेबात विकलेल्या आहेत. ऐरोली येथील चिंचपाडा, इलटणपाडा या भागातील पावसाळी पाण्याला आता खाडीकडे जाण्यास अडथळे येत असल्याने हे पाणी जवळच्या मोकळे रस्ते असलेल्या शहरी भागात घुसत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील ठाणे बेलापूर मार्ग आणि काही अंतर्गत रस्ते क्षमतेपेक्षा जास्त झालेल्या पावासाने नद्यांचे रूप धारण करीत आहेत.

भरती व पाऊस एकाच वेळी..

नवी मुंबईत पाणी भरण्याच्या घटना तशा विरळच आहेत. रविवार, सोमवारी पडलेला पाऊस हा सरासरी पेक्षा जास्त होता. मागील आठवडय़ातही हीच स्थिती निर्माण झाली आहे. भरती आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला की हे नियोजनबद्ध शहरदेखील आता पाण्याखाली येऊ लागले आहेत. मुंबईचा आकार हा बशीसारखा आहे पण नवी मुंबई ही निमुळती आहे. पूर्व बाजूकडून पश्चिम बाजूकडे तिला निमुळता आकार देण्यात आला आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था आहे पण अलीकडे बेकायेदशीर बांधकामे आणि दगडखाणीनी पाण्याच्या मार्गात घातलेले धोंडे यामुळे नवी तुंबई निर्माण होत आहे.

* पावसाळी नाल्यांची सफाई चांगल्या प्रकारे होण्याची आवश्यकता आहे. ती यंदा चांगली झाली नसल्याने पाणी तुंबले.

* दगडखाणीतील कामगारांसाठी बांधण्यात येणाऱ्या झोपडय़ा या पावसाळी नाल्यावर भराव टाकून उभारल्या.